फळणी गावच्या हद्दीत आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह

सातारा : कास धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फळणी, ता. जावळी गावच्या हद्दीतील झाडीत एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. संबंधित तरुणाच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव झाला असल्याचे दिसून आले असून, त्याचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार असल्याचे मेढा पोलिसांनी सांगितले.

संजय शेलार (वय 35, रा. अंधारी, ता. जावळी), असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठार आणि धरणापासून पाच किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर फळणी हे गाव लागते. या गावच्या हद्दीत अंधारी बस स्टॉप आहे. या थांब्याच्या एस वळणाच्या खालील बाजूस असलेल्या झाडीत काही नागरिकांना गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह निदर्शनास आला. यानंतर संबंधिताने ही माहिती फळणी गावचे पोलीस पाटील सखाराम साळुंखे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जावून मृतदेह पाहून याबाबतची खबर मेढा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तांबे, मेढा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी पाटील यांसह स्थानिक गुन्हे शाखा व मेढा पोलीस ठाणे येथील अधिकारी कर्मचारी सकाळी अकरा वाजल्यापासून घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर मयत इसमाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. परिसरामध्ये चौकशी तसेच मयत इसमाचा फोटो सर्वत्र दाखविल्यानंतर सदरची मयत व्यक्ती ही अंधारी तालुका जावली येथील संजय गणपत शेलार वय वर्ष 32 असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा जागेवरच पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मेढा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हलविण्यात आला. त्याच्या गळ्यावर काही खुणा दिसत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमके कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


मागील बातमी
उपचारात हलगर्जीपणा, तरूणाचा मृत्यू
पुढील बातमी
नुकसान प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

संबंधित बातम्या