वाई : तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने धोम धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग शुक्रवारी (ता. ३१) दुपारी तीन वाजता चार हजार ९६४ क्युसेक तर सायंकाळी ६ वाजता तो सहा हजार ३३५ पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. तीरावरील महागणपती मंदिरासह अनेक मंदिरांत पाणी शिरले आहे.
शहर व परिसरात काल रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. आज सकाळपासून तो आणखी वाढत गेला. तालुक्याच्या पश्चिम भागात अद्यापही पाऊस सुरू आहे. आज दिवसभरात धोम- बलकवडी पाणलोट क्षेत्रात ६८ मिलिमीटर पाऊस झाला असून, एकूण २१५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
धरणात १५९९ क्युसेक पाणी आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी ८१०.८२ मीटर झाली असून, पाणीसाठा ३.६० टीएमसी इतका झाला आहे. धरण ८८.२९ टक्के भरले आहे. या धरणातून १०५५ क्युसेक पाणी धोम धरणात येत आहे, तर धोम धरण पाणलोट क्षेत्रात २४ मिलिमीटर पाऊस झाला असून, एकूण ६७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात ३२८२ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.
त्यामुळे धरणाची पाणी पातळी ७४५.४७ मीटर झाली आहे. सद्यःस्थिती धोम धरणामध्ये १२.०७ टीएमसी (८९.१३ %) पाणीसाठा झाला आहे. धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी ११ वाजता होणारा २४१२ क्युसेक विसर्ग दुपारीनंतर वाढविण्यात आला आहे.