सातारा : सातारा जिल्ह्याच्या जडणघडणीत अनेक नेत्यांचा हातभार असून यामध्ये देशभक्त क्रांतिकारी किसन वीर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे विचार आणि कार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
कवठे, ता. वाई येथील कै. देशभक्त क्रांतिवीर किसन वीर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री श्री. देसाई यांनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, वाई पंचायत समितीचे सभापती विक्रांत डोंगरे, उपसभापती वर्षा जगताप, कवठे गावच्या सरपंच मानली पोळ, सत्यजित वीर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण, देशभक्त क्रांतिवीर किसन वीर, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सातारा जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले. त्यामुळेच आज शेतकऱ्यांच्या ऊसाला व दुधाला भाव मिळत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील अग्रणी बँक म्हणून ओळखली जाते. त्याचा पाया ही याच नेत्यांनी रचला.
येथील शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊन किसन वीर यांनी साखर कारखान्याची निर्मिती केली. राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले हे योगदान कधीही विसरता येणार नाही, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणाले, देशभक्त क्रांतिवीर किसन वीर यांच्या दूरदृष्टीमुळे जांब येथे सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला. या कारखान्याचा पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांना लाभ होत आहे. आपली मुले शिकली पाहिजेत आणि त्यांची आर्थिक प्रगती झाली पाहिजे हा दूरदृष्टी विचार करून त्यांनी जनता शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेमध्ये सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळावे यासाठी त्यांनी धोम धरणाची उभारणी केली. त्यांनी दिलेले विचार, दिशा याच्यावरच वाटचाल करणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याच्या जडणघडणीत क्रांतिवीर किसन वीर यांचा मोलाचा वाटा - पालकमंत्री शंभूराज देसाई, कवठे येथे जयंतीनिमित्त पुतळ्यास अभिवादन कार्यक्रम
by Team Satara Today | published on : 05 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा