नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधून बोलताना दहशतवाद्यांना कल्पनाही केली नसेल अशी कठोर शिक्षा देण्याचा इशारा दिला आहे. तसेच दहशतवादाची पाळंमुळं उद्ध्वस्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. यानंतर भारतीय नौदलाने एक महत्त्वाची चाचणी पूर्ण केली आहे. नौदलाने नवीनतम स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशकाची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. समुद्र सपाटीलगत उडणाऱ्या क्षेपणास्त्राची वेद घेण्यात हे मिसाईल महत्वाचे ठरणार आहे. आयएनएस सुरतने हे चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. हा भारताची संरक्षण क्षमता मजबूत करण्याच्या दृष्टिकोणातून आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे शत्रुंवर हल्ला करण्यासोबतच शत्रुंकडून होणारा हल्ला रोखण्यात देखील भारतीय नौदल सक्षम होणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये बोलताना पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. "मी अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की या दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल, त्यांना सोडले जाणार नाही. आता दहशतवाद्यांचे उरले सुरले मैदान नष्ट करण्याची वेळ आली आहे. 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा मोदींनी पाकिस्तान दिला आहे.
भारतीय नौदलाने व्हिडिओ शेअर केला
भारतीय नौदलाने आयएनएस सुरतच्या यशस्वी चाचणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताा नौदलाने लिहिले की "हा मैलाचा दगड भारतीय नौदलाच्या देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्याच्या अढळ वचनबद्धतेचे आणि स्वावलंबी भारताप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक आहे. भारतीय लष्कराच्या नवीनतम स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक आयएनएस सुरतने समुद्रात अचूकतेने लक्ष्य गाठले, जे आपल्या संरक्षण क्षमता मजबूत करण्यात आणखी एक मैलाचा दगड ठरले."
पाकिस्तानही करतंय क्षेपणास्त्रांची चाचणी
वृत्तसंस्था एएनआयने संरक्षण सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, "पाकिस्तानने 24-25 एप्रिल रोजी त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कराची किनाऱ्याजवळ जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची अधिसूचना जारी केली आहे." सूत्रांनी असेही म्हटले आहे की "भारतीय एजन्सी सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत."