दहशतवादाविरोधात ३२०० महिलांची एकत्रित शपथ

देवेंद्र फडणवीसांना सादर केले प्रतिज्ञापत्र

by Team Satara Today | published on : 22 May 2025


मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला आहे. यानंतर आता देशातील दहशतवादी कारवायांविरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या ३२०० महिलांनी सही केलेले प्रतिज्ञा पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले. या प्रतिज्ञेमधून महिलांनी केवळ भावना व्यक्त न करता, कृतीशील निर्णयांची जबाबदारी घेत देशप्रेमाचा ठोस प्रत्यय दिला.

ही पत्रे २० मे रोजी मुंबईत आयोजित ‘सिंदूर यात्रा’ या नंतर सादर करण्यात आली. भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ, आणि दहशतवादाला प्रतिकार म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेत हजारो महिलांनी लाल साड्या परिधान करून, हाती राष्ट्रध्वज घेऊन राष्ट्रभक्तीपर घोषणांसह सहभाग घेतला होता. वीरमाता अनुराधा गोरे आणि समाजसेविका डॉ. मंजू लोढा यांच्या नेतृत्वात ही यात्रा मणीभवन चौक ते हिरोज ऑफ किलाचंद उद्यान दरम्यान काढण्यात आली होती. यात्रा संपल्यानंतर उपस्थित महिलांनी एकजुटीने सरकारला हे प्रतिज्ञापत्र सादर केले.

१. पाकिस्तान, तुर्की व त्यांच्या सहयोगाने बनवलेल्या कोणत्याही वस्तूंचा वापर न करण्याची आणि स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर करण्याची प्रतिज्ञा.

२. मुंबईत अनधिकृतरित्या वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी, रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांशी कोणताही आर्थिक व्यवहार न करण्याचा निर्धार.

३. ‘स्लीपर सेल’ आणि घुसखोरांविरोधात शासनाला सहकार्य करून, त्यांना हद्दपार करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे आश्वासन.

४. भविष्यात कोणतीही आपत्ती किंवा गरज उद्भवल्यास शासनासोबत खंबीरपणे उभे राहण्याची हमी.

या महिलांनी सांगितले की, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर झुंजणाऱ्या सैनिकांच्या पाठिशी उभे राहणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यांच्या त्यागाची जाणीव केवळ शब्दांत न करता, कृतीतून व्यक्त करणे, हीच खऱ्या अर्थाने देशसेवा ठरते.

हे प्रतिज्ञापत्र म्हणजे केवळ एक औपचारिक निवेदन नाही, तर सजग नागरिकांनी घेतलेली सामूहिक जबाबदारीची शपथ आहे. महिलांनी घेतलेली ही भूमिका सामाजिक जागृती आणि राष्ट्रनिष्ठेचा ठोस प्रत्यय आहे. अशा कृतींमुळे शासन आणि समाज यांच्यात विश्वास निर्माण होतो आणि देशविरोधी मानसिकतेविरुद्ध एकजूट निर्माण होते. आजच्या या प्रतिज्ञेने सिद्ध केले आहे की, राष्ट्ररक्षण ही केवळ सीमा भागाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक जबाबदार नागरिकाच्या कृतीतून घडणारी एक कार्य शक्ती आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रवासादरम्यान दागिन्यांची चोरी
पुढील बातमी
मुसळधार पावसामुळे पुणे-बेंगळुरु महामार्गावर पाणी साचल्याने एक तास वाहतूक बंद

संबंधित बातम्या