सातारा : समग्र शिक्षा राष्ट्रीय आविष्कार अभियान अंतर्गत सातारा जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक ,प्रज्ञावंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा दिनांक 28 फेब्रुवारी ते 3 मार्च 2026 अखेर चार दिवस तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे साडेपाच वाजता एसटी बसेस ने या अभ्यास दौऱ्याची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग हा किल्ला विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचे महत्व म्हणजे अजूनही किल्ला चांगल्या प्रकारे सुव्यवस्थित आहे. विद्यार्थ्यांना या किल्ल्यावरील मुन्सफ कोर्ट ,उपळ्या बुरुज, अंबारखाना, तोफखाना, जल महाल, नरमादी धबधबा, प्रचंड मोठी तटबंदी, खंदक, किल्ल्याच्या मधून वाहणारी नदी इत्यादी स्थळे पाहावयास मिळाली. ऐतिहासिक संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली. किल्ला चालुक्य व बहामनी साम्राज्याचे वैभव दर्शवितो. किल्ला पाहून झाल्यानंतर हा अभ्यास दौरा रात्री अकरा वाजता हैदराबाद येथे पोहोचला. चार दिवस मुक्काम चहा, अल्पोपहार ,दोन वेळचे जेवण इत्यादी सर्व सोयी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आल्या होत्या.
दिनांक एक मार्च रोजी हैदराबाद येथील प्रसिद्ध चारमिनार विद्यार्थ्यांनी पाहिला ,त्यानंतर जगातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय सालारजंग म्युझियम दाखविण्यात आले .या म्युझियममध्ये देश विदेशातील अनेक प्राचीन वस्तू, प्राचीन व अर्वाचीन लोककला, प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे, चिनी मातीच्या वस्तू, प्राचीन काळातील शस्त्रे, अश्मयुगीन काळातील भांडी ,शस्त्रे व इतर वस्तू विद्यार्थ्यांना पहावयास मिळाल्या. या म्युझियममध्ये एकूण 36 कक्ष असून या कक्षामध्ये विविध देशातील ,विविध प्रांतातील अनेक वस्तू प्रदर्शित करण्यात आले आहेत. या म्युझियममध्ये विद्यार्थ्यांना जवळपास 46000 वस्तू व अनेक हस्तलिखित, प्राचीन ग्रंथ संपदा, भारताच्या इतिहासाचे चित्ररूप प्रदर्शन पहावयास मिळाले. मुख्य आकर्षण होते ते या वस्तू संग्रहालयातील मोठे घड्याळ या घड्याळाचे वैशिष्ट्य असे की दर एक तासाला या घड्याळामध्ये छोटेखानी सैनिकांचे संचलन होते व घड्याळातल्या आतील भागातून एक सैनिक येतो व त्या त्या वेळचे टोल देतो. विद्यार्थ्यांना 12 टोल देतानाचा अभूतपूर्व नजराना पहावयास मिळाला. या वस्तू संग्रहालयातून विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक ,सामाजिक ,आर्थिक, राजकीय, भौगोलिक, वैज्ञानिक इत्यादी चांगले अनौपचारिक शिक्षण घेतले. त्यानंतर जेवण झाल्यानंतर नेहरू प्राणी संग्रहालय विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले ,यामध्ये पांढरा वाघ ,सिंह ,चित्ते, बिबटे,अस्वल, जिराफ, पिसारा फुलवलेला मोर, विविध प्रकारची माकडे फुलपाखरू उद्यान, एक शिंगी गेंडा इत्यादी प्राणी पक्षी पहावयास मिळाले.
तिसऱ्या दिवशी सकाळी विद्यार्थ्यांनी बिर्ला मंदिरास भेट दिली. त्यानंतर बिर्ला सायन्स सेंटर व म्युझियमला भेट दिली. या ठिकाणी इसवीसन पूर्वीपासून ते आत्तापर्यंतच्या अनेक वस्तू मूर्ती हडप्पा व मोहनजोदारो संस्कृतीतील वस्तू, अनेक हस्तलिखिते, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या हस्ताक्षरातील कविता, हिरे, रत्ने, पाचू, माणिक ,मोती व सोन्याची जर असलेली चादर पहावयास मिळाली. याच सायन सेंटरमध्ये भारताच्या इस्रो ने सोडलेले अवकाशातील सर्व उपग्रहांच्या प्रतिकृती, चार्टस, माहिती पाहवयास, मिळाली. तसेच या ठिकाणी विज्ञानावर आधारित अनेक प्रयोग मुलांना स्वतः करावयास मिळाले याचा आनंद विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे घेतला. यानंतर बिर्ला प्लॅनेटोरियम येथे विद्यार्थ्यांना आकाशगंगा, ग्रहांची निर्मिती, पृथ्वी, सूर्यमाला इत्यादी विषयावर महत्त्वाचा चित्रपट दाखविण्यात आला.
त्यानंतर विद्यार्थ्यांना एनटीआर गार्डन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शंभर फुटी पुतळा असलेले स्मारक दाखविण्यात आले. तदनंतर लुंबिनी पार्क, हुसेन सागर तलावामध्ये बोटिंग करण्यात आले याच ठिकाणी गौतम बुद्ध यांचा 70 फुटी पुतळा दाखवण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांना हैदराबाद टुरिझम कार्पोरेशन तर्फे आयोजित करण्यात आलेला लेझर शो दाखविण्यात आला. लेझर शो मध्ये भारताची यशोगाथा त्याचप्रमाणे हैदराबादचा इतिहास व तेलंगणाचा इतिहास कारंजाच्या पाण्यावर चित्ररूपाने पाहावयास मिळाला याचा आनंद व माहिती विद्यार्थ्यांनी आनंदाने ग्रहण केली.
चौथ्या दिवशी सकाळी नऊ वाजता हैदराबादमधून बाहेर पडल्यानंतर दहा वाजता गोवळकोंडा किल्ल्याला विद्यार्थ्यांनी भेट दिली. या किल्ल्यामध्ये अनेक ऐतिहासिक घटना प्रसंग व स्थळे पाहिली. विद्यार्थ्यांनी गोवळकोंड्याच्या किल्ल्याचा इतिहास समजून घेतला. यामध्ये राणी महाल, दरबार, धान्याची कोठारे, महाल, दासींचा महाल रंग महाल इत्यादी स्थळे पाहिली. भिंतीला कान असतात ही म्हण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समजून घेतली कारण या ठिकाणी एका कोपऱ्यात बोललेले दूरवर दुसऱ्या भिंतीच्या कोपऱ्यात भिंतीलगत ऐकू जाते, येथूनच ही म्हण पडली.
त्यानंतर महाराष्ट्राचे आद्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यास दोन वेळा भेट दिली होती ते स्थळ पाहण्यात आले अशा प्रकारे गोळकोंडा किल्ला पाहून झाल्यावर विद्यार्थ्यांनी आयआयटी हैदराबाद या ठिकाणी भेट दिली. आयआयटी चे महत्व समजून घेतले. या ठिकाणी येण्यासाठी काय करावे लागते ,अभ्यास कसा करावा लागतो , आयआयटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोण कोणत्या संधी मिळतात त्याचे महत्त्व काय याचे ज्ञान विद्यार्थ्यांनी घेतले.यानंतर सदरची सहल आयआयटी वरून निघून पहाटे चार वाजता सातारा येथे सुखरूप पोहोचली. या अभ्यास दौऱ्याची नेतृत्व उपशिक्षणाधिकारी श्री.सन्मती देशमाने यांनी केले तर दौऱ्यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी श्री संभाजी कानवटे, शिक्षक जावेद मुल्ला ,सचिन शिंदे, गणेश मोरे, अश्विन राठोड, सीमागौरी पवार, अनिता गोरे व शोभा शिंदे यांनी व्यवस्थितपणे अभ्यास दौऱ्यामध्ये विशेष योगदान देऊन अभ्यास दौरा व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.