बदलापूर : राज्यात बदलापूरच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे, असं असतानाच आता बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी एका चिमुकलीवर केलेल्या अत्याचारानंतर त्याच्यावर अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी एक गुन्हा दाखल झाल्यानंतर शाळेतील सफाई कर्मचारी असलेल्या आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. आता आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. शाळेतील आणखी एका चिमुकलीवर अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याची बाब तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीकडून अक्षय शिंदेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय शिंदे हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्येच आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे याची पोलिसांकडून मानसिक तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत एसआयटीने न्यायालयात अर्ज दाखल केलेला असून न्यायालयाच्या परवानगीनंतर ही तपासणी करण्यात येणार आहे.