सातारा : सोमवार दिनांक २१ जुलै २०२५ रोजी बसप्पा पेठ सातारा येथे दुपारी ४ च्या सुमारास एका अल्पवयीन मुलीला तिच्या घराजवळ एका युवकाने अचानक तिच्या गळ्याला चाकू लावला. यावेळी सदर मुलीने बचावासाठी व मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी आजूबाजूचे लोकांनी तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. हल्लेखोर युवक मात्र काही केल्या कोणाचेही ऐकत नव्हता.
यावेळी सदर मुलीला वाचविण्यासाठी मोठ्या धाडसाने उमेश मानसिंग अडागळे यांनी हल्लेखोर युवकाचा सुरा असलेला हात पकडला व अमोल सुभाष इंगोले, पोलीस कॉस्टेबल धीरज दिपक मोरे, कॉस्टेबल सागर मोहन निकम यांनी शिताफीने हल्लेखोर युवकाला पकडून पिडीत शाळकरी मुलीचा जीव वाचवला. या धाडसी युवकांचा श्री बालाजी चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, सन्मानपत्र व छ. शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देवून श्री बालाजी चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, सचिव संजय कदम, आनंद गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शीला वेल्हाळ, अनुराधा कदम, सोनाली तांबोळी, विश्वनाथ फरांदे उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र चोरगे म्हणाले की, समाजामध्ये अनेकवेळा चुकीच्या गोष्टी घडत असतात बऱ्याच वेळा घटना स्थळावरील काही नागरिक संकट काळातील व्यक्तीला मदत करण्याऐवजी मोबाईलवर व्हीडीओ तयार करून सोशल मिडीयावर प्रसारित करण्यात दंग असतात. परंतु अशा प्रसंगी जिथे अन्याय दिसतो तेथे सजगतेने कृती हवी आपण फक्त प्रेक्षक बनून राहू नये, तर गरज पडेल तेव्हा कृतीशील नागरिक बनून पुढे यायला हवे. प्रत्येक नागरिकांनी अशा पद्धतीने जागृत राहून समाजातील चुकीच्या गोष्टीसाठी आपले कर्तव्य म्हणून धाऊन गेले तर, वाईट घटना करण्याची हिंमत कोण करणार नाही. उमेश मानसिंग अडागळे, अमोल सुभाष इंगोले, पोलीस कॉस्टेबल धीरज दिपक मोरे, कॉस्टेबल सागर मोहन निकम हे खरे समाजाचे हिरो आहेत.