शिरवळमध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्या युवकाला अटक; १५ ग्रॅम 'एमडी'सह बुलेट जप्त

by Team Satara Today | published on : 29 June 2026


शिरवळ :  खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे बसस्थानक परिसरात अमली पदार्थ (एमडी) मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या एका २१ वर्षीय युवकाला शिरवळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून १५ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली असून, अवघ्या १५ दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

​याप्रकरणी पोलिसांनी मंदार मंगेश शहाणे (वय २१, रा. शिरवळ, ता. खंडाळा) या संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे. शिरवळ येथील एस.टी. बसस्थानक परिसरात एक युवक एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने तातडीने बसस्थानक परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित मंदार शहाणे हा बसस्थानकात ग्राहक शोधत उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने आपल्या बुलेट दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.

​त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांना १५ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर मिळून आली, जी पोलिसांनी तातडीने जप्त केली. या धडक कारवाईची माहिती मिळताच डीवायएसपी धन्यकुमार गोडसे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिट्टे, कीर्ती म्हस्के, पोलीस अंमलदार सचिन वीर, नितीन नलावडे, अरविंद बाणहाळे, सूरज चव्हाण, अजित बोन्हाटे, भाऊसाहेब दिघे, तुषार अभंग, संजय केंगले, संपत कांबळे आणि संतोष इंगवले यांच्या पथकाने केली असून शिरवळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समस्या सोडवा, कामात दिरंगाई चालणार नाही - ना. शिवेंद्रसिंहराजेंची अधिकाऱ्यांना आक्रमक तंबी, सातारा शहरातील विकासकामांची पाहणी
पुढील बातमी
नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणी नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

संबंधित बातम्या