सातारा : सातारा शहरातील जुन्या एमआयडीसी परिसरात एक अल्टो कार व एक बुलेट मोटरसायकल चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या गुन्ह्यातील 4 संशयीतांना ताब्यात घेण्यात सातारा शहर डीबी पथकाला यश आले आहे. संबंधितांकडून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
करण छगन जाधव, आशुतोष नारायण पिसाळ दोघेही रा. शेंदुरजणे, ता. वाई, जि. सातारा, प्रेम दीपक सुर्वे, विशाल किसन साबळे दोघेही रा. धनगरवाडी, कोडोली, सातारा अशी ताब्यात घेण्यात आलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी शहरातून चोरीस गेलेल्या मालमत्ता व आरोपींचा शोध घेण्यासाठी डीबी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथक गस्त घालित असताना सातारा बस स्थानक परिसरामध्ये एकजण संशयास्पदरित्या फिरताना आढळल्याने तसेच त्याच्या ताब्यातील मोबाईल बाबत समाधानकारक उत्तरे देत नसल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने तो मोबाईल दि. 8 रोजी वाढे फाटा येथील एका चारचाकी वाहनातून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यानंतर त्याने त्याच्या इतर तीन साथीदारांसह सातारा शहरातील जुन्या एमआयडीसी मधील अल्टो कार व बुलेट मोटरसायकल चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. हे दोन्ही गुन्हे सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यानंतर संबंधिताच्या तिन्ही साथीदारांना ताब्यात घेण्यात आलेले असून गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल जप्त करून मोबाईल चोरीचा एक गुन्हा, चार चाकी अल्टो कार व दुचाकी बुलेट वाहन चोरी करण्याचा प्रयत्न असे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, निलेश यादव, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी सहभाग घेतला.