दिल्ली : NEET-UG पेपर लीक प्रकरणाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि अत्याचाराच्या विरोधात दाखल झालेल्या दोन वेगवेगळ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी, २७ जुलै रोजी सुनावणी करण्यास तयार झाले आहे.ज्येष्ठ वकील श्याम दिवाण आणि गोपाल शंकरनारायणन यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर हा गंभीर मुद्दा तातडीच्या सुनावणीसाठी उपस्थित केला.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी गेल्या दोन दिवसांत कोर्टाबाबत पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली होती. "गेल्या दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याबाबत पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी विधाने करण्यात आली. आज सकाळी १० वाजेपर्यंत न्यायालयात एकही पान (याचिका) अधिकृतपणे दाखल झालेले नव्हते. न्यायालयात केवळ एक साधे पत्र किंवा निवेदन आले होते. अशा पत्राला मी थेट रिट याचिका कसे मानू शकतो?", असे सूर्यकांत म्हणाले होते.
शुक्रवारच्या कामकाजादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने याचिकांना नंबर दिल्याची माहिती वकील गोपाल शंकरनारायणन यांनी दिली. २० जुलै रोजी दिल्लीत निघालेल्या 'संसद चलो' मार्चदरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. संसद भवनाकडे आगेकूच करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या या हिंसक कारवाईविरोधात विद्यार्थ्यांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.