बारामती : यवत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार आणि त्याला मदत केल्याच्या गंभीर गुन्ह्यातून बारामती येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. मा. अतिरिक्त सत्र न्यायालय (कोर्ट क्र. ४) यांनी सत्र प्रकरण क्र. ६०/२०१७ मध्ये ६ मे २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, चंद्रकांत गोपाळ भोसले आणि अरुणा विश्वास फसगे अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.
सदर प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, यवत पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये गु.र.नं. ७९५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. यामध्ये आरोपी क्र. १ विरुद्ध बलात्काराचा, तर आरोपी क्र. २ विरुद्ध या गुन्ह्यासाठी सहाय्य (Abetment) केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. खटल्यादरम्यान एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. बापूसाहेब शिलवंत यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि सखोल युक्तिवाद केला. त्यांना याकामी ॲड. रवी अवघडे, ॲड. सागर खरात, ॲड. राहुल गिरमे आणि विधी सेवा समितीचे मॉनिटर ॲड. पाटील यांचे सहकार्य लाभले.
बचाव पक्षाने न्यायालयात पीडितेच्या साक्षीतील विसंगती आणि डीएनए अहवालाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विशेषतः डीएनए नमुने गोळा करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष न झाल्यामुळे 'चेन ऑफ कस्टडी' सिद्ध करण्यात अभियोजन पक्ष अपयशी ठरल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. न्यायालयाने ही बाजू ग्राह्य धरताना स्पष्ट केले की, पीडितेची साक्ष कायदेशीरदृष्ट्या पूर्णतः विश्वासार्ह वाटत नाही. तसेच केवळ डीएनए अहवालावर अवलंबून राहणे कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
या निकालात मुंबई उच्च न्यायालयाच्या 'सुरेश देविदास माळचे विरुद्ध महाराष्ट्र राज्य' या प्रकरणातील निकालाचा आधार घेण्यात आला. पुराव्यांमधील त्रुटींमुळे आरोपींविरुद्धचे आरोप संशयातीतरित्या सिद्ध होऊ शकले नाहीत, असे स्पष्ट करत न्यायालयाने दोघांचीही निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, न्यायालयाने पीडितेला महाराष्ट्र व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम व मनोधैर्य योजनेअंतर्गत नुकसान भरपाई आणि समुपदेशन सुविधा मिळवून देण्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांना शिफारस केली आहे.