लीलावती रुग्णालयात काळी जादू

केबिनच्या फरशीखाली हाडं, मानवी केस सापडली; 1250 कोटींचा घोटाळाही उघडकीस

by Team Satara Today | published on : 13 March 2025


मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालय चालवणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टने माजी विश्वस्त आणि संबंधित व्यक्तींवर १,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप केला आहे. लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय आणि वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. ट्रस्टने असाही दावा केला आहे की, माजी विश्वस्त आणि त्यांचे सहकारी रुग्णालयाच्या परिसरात काळी जादू करत होते. ट्रस्टचा दावा आहे की काळ्या जादूशी संबंधित काही साहित्य, जसे की मानवी अवशेष, मडकी अशा अनेक गोष्टी रुग्णालयाच्या आवारात दिसन आले आहे. नेमकं काय आहे प्रकरण?

लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने गेल्या २० वर्षात लीलावती रुग्णालयात १,२५० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी १७ जणांविरुद्ध खटला दाखल केला आहे. याप्रकरणी पत्रकार परिषदेत लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी ही माहिती दिली. याचदरम्यान, त्याने आणखी एक धक्कादायक माहिती दिली, ती म्हणजे लीलावती रुग्णालयात काळी जादू केली जात आहे. परमबीर सिंह म्हणाले की, ट्रस्टच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी तक्रार केली होती की, कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत मेहता आणि त्यांची आई चारू मेहता ज्या कार्यालयात बसतात तिथे काळी जादू केली जात आहे.

ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काळी जादू, अघोरी कर्मकांड केल्याची माहिती दिली होती. त्याआधारे संबंधित कार्यालयात खोदकाम केले असता तेथे मानवी अवशेष असलेली आठ मडकी, तांदूळ, केस आणि कर्मकांडांसाठी आवश्यक सामग्री सापडल्याचा दावा कार्यकारी संचालक परमबीर सिंह यांनी केला. तसेच “कार्यालयाच्या फरशीचे उत्खनन केले असता, मानवी अवशेष, तांदूळ, मानवी केस आणि इतर काळ्या जादूच्या साहित्याने भरलेले आठ भांडे पुरलेले आढळले,” असे माजी पोलिस आयुक्त म्हणाले. पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्यानंतर, आम्ही वांद्रे न्यायालयात धाव घेतली आणि आता दंडाधिकारी स्वतः बीएनएसएसच्या कलम २२८ अंतर्गत प्रकरणाची चौकशी करत आहेत.

लीलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापन सध्याच्या संचालक मंडळाने ताब्यात घेतल्यानंतर, माजी संचालक मंडळावर शेकडो कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला. म्हणून संचालक मंडळाने कामकाजातील अनियमितता उघड करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली.

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ट्रस्ट फंडचे परदेशी खात्यांमध्ये बेकायदेशीर हस्तांतरण, कायदेशीर खर्चाच्या स्वरूपात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, फसव्या गुंतवणूक आणि आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लाचखोरी अशा गंभीर अनियमितता आढळून आल्या. तसेच, फॉरेन्सिक ऑडिटमध्ये सुमारे १२५० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता उघडकीस आली. या कारवाईमुळे ट्रस्टच्या आर्थिक अखंडतेला धक्का बसला आहे. यानंतर कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत किशोर मेहता (५५) यांनी माजी विश्वस्तांसह १७ जणांविरुद्ध वांद्रे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

दरम्यान पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्यावर त्यांनी वांद्रे न्यायालयात तक्रार दाखल केली. लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, न्यायालयाने वांद्रे पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यपालांनी घेतला कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा
पुढील बातमी
आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

संबंधित बातम्या