सातारा : समग्र शिक्षण अभियानांतर्गत कराड नगर परिषदेच्या शाळा 10 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये 60 टक्के केंद्र शासनाचा व 40 टक्के राज्य शासनाचा हिस्सा आहे. त्यामुळे या शाळेचे काम वेळेत व उच्च दर्जाचे करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
कराड येथील नगर परिषद शाळा क्र.3 च्या सुरु असलेल्या कामाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी, शाळेचे मुख्याध्यापक सुहास आलेकरी, राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच नगर परिषद शाळा क्र.3 चे काम करावे, असे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी देऊन ते म्हणाले, माझी शाळा आदर्श शाळा उभारण्यासाठी ज्या प्रमाणे उच्च दर्जाचे साहित्य वापरले आहे त्या पद्धतीचे उच्च दर्जाचे साहित्य या शाळेच्या कामासाठी वापरावे. नगर परिषद शाळा क्र.3 ही शाळा अत्यंत चांगली असून ती अजून चांगली करण्याच्या दृष्टने काम करावे.
शाळेत सेक्युरेटी केबीन, कंपाऊंड याचेही काम हाती घ्यावे. या शाळेत 2 हजार 300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तेथील पार्कींगचाही प्रश्न मार्गी लावावा. या शाळेचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री यांची भेट घेणार असल्याचेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.