अकरावीच्या विशेष फेरीला अतिवृष्टीमुळे पुन्हा मुदतवाढ; ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संधी

by Team Satara Today | published on : 07 July 2026


मुंबई : अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास अडचणी निर्माण झाल्या. या पार्श्वभूमीवर अकरावीच्या विशेष फेरी-१ ची मुदत पुन्हा एकदा वाढविण्यात आली असून विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी आता ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संधी देण्यात आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने सोमवारी याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

राज्यात यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून त्यापैकी १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश निश्चित केला आहे.

पहिल्या विशेष फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतर निर्धारित शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा लागेल. महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांशी संपर्क साधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेशाची पुष्टी, नकार अथवा प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया महाविद्यालयांच्या लॉगिनद्वारे पूर्ण केली जाणार आहे.

दरम्यान, प्रवेश निश्चितीची मुदत संपल्यानंतर ९ जुलै रोजी डेटा प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी सकाळी १० वाजता रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाईल. रिक्त जागांचा आढावा घेतल्यानंतर पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुरुवारी राज्यभर ‘शाळा बंद’ आंदोलन; बीएलओ ड्युटी आणि पदोन्नती प्रक्रियेवर शिक्षक संघटना आक्रमक
पुढील बातमी
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण 34 टक्के भरले; महाबळेश्वर महसूल मंडळात 393 मि.मी. पाऊस - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या