स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरी (सातारा) : ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या दुसऱ्या कविसंमेलनात सामाजिक, राजकीय आणि मानवी जीवनातील विदारक वास्तव मांडणाऱ्या कवितांनी रसिकांना अंतर्मुख केले. दुष्काळ, महागाई, राजकीय अनास्था, स्त्रीजीवन, शेतकरी प्रश्न, बालिकांचे शोषण अशा ज्वलंत विषयांवर कवींनी निर्भीडपणे भाष्य केले.
राज्यातील ३२ निमंत्रित कवींचा यात सहभाग होता. “जो स्वतःला माणूस समजतो आणि माणसासारखे वागतो तोच कवी”असे सांगत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून रसिकांशी संवाद साधला. त्यांच्या 'कविंनी तुकोबा व्हावे' या कवितेने संमेलनाची सुरुवात झाली.
निरुपमा महाजन यांनी सादर केलेल्या ‘जत्रा’या कवितेने बालिकांच्या लैंगिक शोषणासारख्या संवेदनशील विषयावर सादर करण्यात आलेल्या कवीतेने प्रेक्षागृह स्तब्ध झाले. ज्येष्ठ कवयित्री संजिवनी बोकील यांनी ‘आर्जव’ कवितेतून कचरा वेचक महिलेच्या मुलीची शिक्षणाविषयी कळवळ मांडली. सायली कुलकर्णी यांनी ‘तू चमचमता तारा’, दशरथ परब यांनी 'दूर मी जाऊ कशी' या कविता लयबद्धतेने सादर केल्या.
शेतकरी जीवनाचे विविध पैलू डॉ. कैलास दौंड, मधुकर जाधव आणि राजेंद्र वाघ यांच्या कवितांतून उलगडले. स्त्रीमनाचा वेध घेणाऱ्या कविता अनुराधा गुरव, संगीता केंजळे, सुजाता राऊत, अनुराधा नेरूरकर, मंदाकिनी पाटील आणि ॲड. विठ्ठल काष्टे यांनी सादर केल्या.
विजय ढाले यांनी ‘आमची जिंदगी लाकूडफाटा’ या कवितेतून सर्वसामान्यांच्या जगण्यातील पिळ अधोरेखित केला. नामदेव वाबळे आणि ज. तु. गार्डे यांच्या कवितांनी आई-वडिलांच्या प्रेमाची आठवण करून दिली. आधुनिक तंत्रज्ञानावर दीपाली दातार आणि रामदास खरे यांनी भाष्य केले. धनाजी घोरपडे यांच्या ‘जामिनावर सुटलेला काळा घोडा’ या कवितेने राजकीय व्यवस्थेवर बोचरी टीका केली, तर शिवाजी जोगदंड यांच्या ‘थांबला चिवचिवाट’ या कवितेने बालशोषणाचा प्रश्न ऐरणीवर आणला.
धनश्री पाटील यांनी ‘ऋतुराज वसंत’ही कविता सादर करून वातावरण प्रसन्न केले. राकेश शेटे, व्यंकट अनेराय, गोपाळ नेरकर, किसन पवार, बाळासाहेब गरकळ, मनीष खरगोणकर, प्रकाश धर्मा आदींच्या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. संमेलनाचा समारोप वैशाली राजमाने यांच्या ‘धग’ या कवितेने झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि संमेलनाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांच्या हस्ते कवींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.