सातारा : येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या २८व्या पुरस्कारासाठी केंद्र सरकारच्या डॉ.आंबेडकर फाउंडेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासनाच्या प्रमुख, इतिहास अभ्यासक, संशोधक डॉ. सुनिता सावरकर (नागपूर ) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे व निमंत्रक दिनकर झिंब्रे यांनी दिली.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य,कला, संस्कृती व परिवर्तनाची चळवळ आदी क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्याच्या हेतूने १९९८ सालापासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह,शाल, गुच्छ असे आहे.
यावर्षीचा २८वा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार डॉ. सुनिता सावरकर यांना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्काराच्या मानकरी डॉ. सुनिता सावरकर भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय अंतर्गत कार्यरत आंबेडकर फाउंडेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. आंबेडकर चेअर इन दलित हिस्ट्रीच्या विभाग प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागात अध्यापनाचे काम केले आहे.
डॉ. आंबेडकरांचे विचार व त्यांची समकालीन सुसंगतता, डॉ. आंबेडकर पूर्व व नंतरच्या काळातील भारतीय दलित इतिहास, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती समाजाचा सामाजिक- राजकीय इतिहास, स्त्रीवादी इतिहास लेखन व इतिहासातील दलित आदिवासी व ओबीसी महिलांचे योगदान आदी विषयात त्यांनी मौलिक स्वरुपाचे संशोधन केले आहे. मराठी विश्वकोशामध्ये त्यांनी २१ नोंदी लिहिल्या आहेत. त्यांना संशोधनासाठी राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप, नरहर कुरुंदकर तसेच साधना साप्ताहिकाची 'तांबे - रायमाने' इत्यादी फेलोशिप मिळाल्या आहेत.
त्यांच्या प्रकाशित साहित्यामधील 'ढोर चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ' या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार व भंडारा येथील वैनाकाठ फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. ' खानदेशातील भिल्ल आदिवासी आणि आंबेडकरी चळवळ या ग्रंथास अहमदनगर साहित्य परिषदेचा समीक्षात्मक ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काम करणाऱ्या पहिल्या कर्तबगार चर्मकार महिला गुणाबाई गाडेकर यांचे' स्मृतिगंध ' या आत्मचरित्राचे संपादन केले आहे.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्काराने आतापर्यंत डॉ. ज्योती लांजेवार (नागपूर),प्रा.पुष्पा भावे (मुंबई), रजिया पटेल (पुणे), बेबीताई कांबळे (फलटण), यमुनाबाई वाईकर (वाई),प्रा.डाॅ.प्रज्ञा दया पवार(मुंबई), उर्मिला पवार (मुंबई), डॉ.सिसिलिया कार्व्हालो (वसई),प्रा.डॉ.इंदिरा आठवले (नाशिक), पद्मश्री तिस्ता सेटलवाड (मुंबई),हिरा बनसोडे (मुंबई), प्रतिमा जोशी (मुंबई), उल्का महाजन (पनवेल),प्रा. सुशीला मूल-जाधव (औरंगाबाद), डॉ.गेल ऑम्वेट (कासेगाव), मेधाताई पाटकर (मुंबई),संध्या नरे-पवार (मुंबई),मुक्ता दाभोलकर (दापोली), मुक्ता मनोहर (पुणे),प्रा.आशालता कांबळे ( मुंबई), अॅड.निशा शिवूरकर (संगमनेर) व शिल्पा कांबळे (मुंबई),चेतना सिन्हा (म्हसवड-माण), सुनीता भोसले (आंबळ,शिरुर -पुणे),छाया कोरेगावकर (मुंबई), मंगल खिंवसारा ( संभाजीनगर -औरंगाबाद ), डॉ. मेघा पानसरे (कोल्हापूर )आदी मान्यवर महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संबोधी प्रतिष्ठानचा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार डॉ. सुनिता सावरकर यांना जाहीर; कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते होणार वितरण
by Team Satara Today | published on : 05 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा