सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे - आ. महेश शिंदे, रथोत्सव व यात्रा नियोजनाची प्रशासकीय आढावा बैठक, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह अधिकारी, मान्यवरांची उपस्थिती

by Team Satara Today | published on : 06 December 2025


पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह विविध राज्यांतून लाखो भाविक तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे येतात. यात्रेच्या काळात भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आरओ पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पार्किंग यांसह सर्व सुविधा सुयोग्यरित्या उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश आ. महेश शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

श्री सेवागिरी महाराजांच्या ७८ व्या पुण्यस्मरणानिमित्त होणाऱ्या रथोत्सव व यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित प्रशासकीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आ. शशिकांत शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, डीवायएसपी राजश्री तेरणी, तहसीलदार बाई माने, मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आ. महेश शिंदे म्हणाले की, श्री सेवागिरी यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी शुद्ध पाणी, आरोग्य सेवा आणि स्वच्छतेच्या उपाययोजना ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे.

यात्रेतील जिलबी, फरसाण व खाद्यपदार्थांची गुणवत्ता राखण्यासाठी अन्न भेसळ विभागाने सतत तपासणी करावी. श्री सेवागिरी मंदिर परिसर व रथमार्गावरील सर्व अडचणी दूर करण्यास सांगताना त्यांनी वीज वितरण  कंपनीला पुरेशा दाबाने अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी लागणारा निधी आमदार फंडातून उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. महिलांसाठी कॅन्सर व इतर आरोग्य तपासणी मोहीम राबवण्याचे आदेशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले. पोलिसांनी वाहतूक नियंत्रण व सुरक्षा यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत नजर ठेवावी, असेही ते म्हणाले. बैठकीत आरोग्य, वीज, पाणीपुरवठा, कृषी, पशुसंवर्धन, पोलीस, परिवहन, ग्रामपंचायत व महसूल विभागांच्या तयारीचा आढावा घेऊन पुढील नियोजन करण्यात आले.

भाविकांना सर्वोत्तम सेवा-सुविधा द्याव्यात : आ. शशिकांत शिंदे

 आ. शशिकांत शिंदे यांनीही श्री सेवागिरी महाराज यात्रेचा नावलौकिक वाढत असून, भाविकांना सर्वोत्तम सेवा-सुविधा प्रशासनाकडून मिळाव्यात यावर भर दिला. अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने  यांनी श्री सेवागिरी यात्रा यशस्वीपणे पार पाडण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना दिल्या. 


 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा राष्ट्रवादीमय करण्यासाठी प्रयत्न करणार; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर व पक्षाचे नाव लढणार - जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील,
पुढील बातमी
सावधान ! घरी तुमची कोणीतरी वाट पाहत आहे.. बिबट्यांची दहशत...,. अपघातांची भीती..... सातारकर हैराण !

संबंधित बातम्या