जागावाटप फॉर्मुल्याच्या निमित्ताने रंगणार गनिमी कावा; पक्षीय राजकारणामध्ये आघाड्यांचे अस्तित्व संपुष्टात; नगरपालिकेमध्ये बहुमताचा आकडा ठरणार महत्त्वाचा

by Team Satara Today | published on : 12 November 2025


सातारा : भारतीय जनता पार्टीने पक्षशिस्त आणि नियमांच्या बंधनाने सातारा पालिकेतील आघाड्यांचे राजकारण संपुष्टात आणत त्याला पक्षीय अभिनवेश दिला आहे. उमेदवार येत्या दोन दिवसात निश्चित होत असताना जागावाटप सूत्र कशा पद्धतीने रंगेल त्यानिमित्ताने रस्सीखेच होणार असून गनिमी कावा सुद्धा रंगणार आहे.

2016 च्या निवडणुकीमध्ये सातारा विकास आघाडीच्या 22 नगर विकास आघाडीच्या 12 आणि भारतीय जनता पार्टीचे सहा निष्ठावंत नगरसेवक निवडून आले होते. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आता खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले दोघेही भाजपमध्ये आहेत. आता जागा वाटपाचा फॉर्मुला 28 22 किंवा 25 25 असा असू शकतो. मात्र भाजपच्या निष्ठावंतांना यामध्ये स्थान मिळण्याकरता कमी अधिक जागांचे प्रमाण होऊ शकते. जर नगराध्यक्ष उदयनराजे गटाचा असेल तर नगर विकास आघाडी काही जागा वाढवून मागू शकते. ज्येष्ठत्वाचा मान म्हणून जर सातारा विकास आघाडीचा नगराध्यक्ष होणार असेल तर भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत म्हणून नगर विकास आघाडीच्या वतीने जास्त जागांची मागणी हा गनिमी काव्याचा दुसरा भाग असू शकतो. यापूर्वीही 28 - 22 जागांचा फॉर्म्युला चर्चेत आला होता. तसेच दोन्ही आघाड्यांचे 22 जागा आणि भारतीय जनता पार्टीच्या सहा अशा जागांवरही चर्चा होऊ शकते. सातारा नगरपालिकेच्या कामकाजामध्ये बहुमताचा आकडा महत्त्वाचा आहे. 

नगराध्यक्ष त्यांचे अधिकार हे असले तरी सर्वसाधारण सभेच्या कामकाजात संख्येला जास्त महत्व असते .सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी आपण सर्व एकाच पक्षात भाजपचे आहोत असे वारंवार सांगितले तरी प्रत्यक्ष पालिकेच्या कामकाजामध्ये उदयनराजे गट आणि शिवेंद्रसिंहराजे गट अशी विभागणी सातत्याने राहणार आहे. पक्षीय राजकारणाची सातारा पालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे आघाड्यांचे राजकारण आणि त्याची सवय सुटायला वेळ जाणार आहे. भारतीय जनता पार्टीसाठी जास्तीत जास्त संधी देण्याच्या दृष्टीने नगरविकास आघाडीने मोर्चे बांधणी केली आहे.  त्या दृष्टीने पक्षाने सुद्धा काही नावे सुचवल्याची चर्चा आहे मात्र पक्षश्रेष्ठींनी त्याला दुजोरा दिलेला नाही. मात्र पडद्याआडून नगर विकास आघाडी भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत नगरसेवकांच्या निमित्ताने आपला दावा सभागृहात मजबूत कसा राहील याची निश्चित काळजी घेऊ शकतो. जागा वाटपाचे सूत्र ठरताना दोन्ही राजांची राजकीय मुत्सद्येगिरी पणाला लागणार आहे. कसेही झाले तरी सातारा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा राहणार हे नक्की आहे. मात्र त्या अंतर्गत कोणता गट सातारा पालिकेच्या राजकारणात शिरजोर ठरणार हे पुढील पाच वर्षात महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शिवेंद्रसिंहराजे यांचा कार्यकर्त्यांचा गट कामाला लागलेला आहे. 

नगराध्यक्ष पदाचे पारडे उदयनराजे यांच्या गटात जाण्याची शक्यता जरी असली तरी बहुमताचा आवश्यक आकडा जुळवण्याच्या दृष्टीने कदाचित गनिमी कावा खेळला जाईल याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही .


बंडखोरांना थांबवायचे कसे ?


सातारा पालिकेमध्ये बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक वसंत लेवे यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून आपला अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांची मोर्चेबांधणी त्यांच्या पत्नीसाठी प्रभाग क्रमांक 23 मधून सुरू आहे. लेवे दांपत्य सातारा पालिकेच्या रणांगणात उतरणार हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. अपक्ष ढणाऱ्या वसंत लेवे यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. प्रभाग 11 मध्ये मनोमिलनाने दिलेल्या उमेदवारच्या विरोधात वसंत लेवे लढणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 14 मधून सुद्धा रवींद्र झूटिंग यांनी अपक्ष तयारी सुरू केली आहे. मनोमिलनाला अशा बंडखोरांना तत्काळ थोपवावे लागेल असे नाराज महाविकास आघाडीच्या गळाला लागणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.


पक्षीय राजकारण निवडणुकीपुरते नंतर आघाड्यांचे राजकारण


निवडणुकांचे संकेत पाळण्यासाठी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पक्षीय राजकारण आणि त्याचा अजेंडा राबवला जात आहे. भाजपच्या वर्चस्वाखाली असणारी सातारा नगरपालिका प्रत्यक्षात कामकाजामध्ये उदयनराजे गट आणि शिवेंद्रसिंहराजे गट अशा गटातच चालेल असा अंदाज आहे. थोडक्यात भाजपच्या गोटातील अंतस्थ दोन आघाड्यांमध्येच सर्वसाधारण सभा आणि त्या संदर्भातील आरोप प्रत्यारोप रंगणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पालिकेत पहिला अर्ज दाखल; खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक वसंत लेवे यांची प्रभाग 11 मधून अपक्ष उमेदवारी
पुढील बातमी
सातारा शहरात झालेल्या अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू

संबंधित बातम्या