सातारा : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २८ एप्रिल २०२६ रोजी सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथील नियोजन भवन सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.५५ वाजता जिल्हाधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाली. उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल यांनी प्रास्ताविक करत या दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली. पुढे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची उद्दिष्टे व ठळक वैशिष्ट्ये याबाबत सविस्तर माहिती देत सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना मा. अध्यक्षांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच या कायद्याअंतर्गत सेवा मिळालेल्या लाभार्थ्यांनी आणि ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालकांनी आपले अनुभव व्यक्त केले.
तसेच जिल्हाधिकारी सतोष पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साताराचे तहसिलदार समीर यादव यांनी केले. नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच यावेळी शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांच्या अनुषंगाने अभिप्राय देण्यासाठी क्यू आर कोड चे अनावरण करण्यात आले आणिसेवा हमी कायद्याच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले