कोरेगाव : पोलीस ठाण्यात बेकायदेशीर धंदे, दोन नंबरचे व्यवसाय, गुन्हेगारांना मोकळे रान आणि सामान्य नागरिकांना पोलिसी त्रास, असे गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारला विधान परिषदेत अक्षरशः धारेवर धरले. हिवाळी अधिवेशनात शनिवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घनश्याम बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आ. शिंदे म्हणाले की, कोरेगाव परिसरात सर्रास अवैध धंदे सुरू आहेत. मारहाण, खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपी खुलेआम फिरत आहेत. दोन नंबरचे धंदे करायचे असतील तर करा, असा सल्ला देणाऱ्या पोलिसांच्या ऑडिओ क्लिप्स माझ्याकडे आहेत. हे केवळ आरोप नाहीत, तर पुराव्यांसह वास्तव आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, कोणतेही कारण नसताना स्वतःच्या बाबतीत दोन वेळा पोलीस घरी आले. याबाबत पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले असतानाही आजपर्यंत कोणतीही चौकशी झालेली नाही. हे पोलीस का आले? कुणाच्या सांगण्यावरून आले? हा प्रश्न अनुत्तरित आहे, असेही त्यांनी सभागृहात ठणकावून सांगितले.
गुटखाबंदी असतानाही परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे. हा गुटखा येतो कुठून? त्यावर कारवाई का होत नाही? अवैध धंदे सुरू असतानाच मकोका लावण्याचा प्रयत्न केला जातो, हे कितपत योग्य आहे? असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला.
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची अवस्था बिकट झाल्याचा आरोप करत आ. शिंदे म्हणाले, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बदलीचा दबाव टाकला जातो. गुन्हेगारांना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप होतो. त्यामुळे महाराष्ट्रातील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढत आहे.
ऑनलाइन जुगार आणि गेमिंगमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, अनेक तरुण कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत आहेत. सभागृहात चर्चा होते, आश्वासने दिली जातात; पण प्रत्यक्षात ऑनलाइन गेमिंगवर बंदी कुठे आहे? कारवाई कुठे आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कारवाई फक्त विरोधकांवर होते. आधी कारवाई करा, असे सांगायचे आणि नंतर तोच माणूस तुमच्याकडे आला की कारवाई करू नका असे आदेश दिले जातात. हीच सध्याची सत्ताधाऱ्यांची रणनीती आहे, असा आरोप करत आ. शिंदे यांनी सरकारवर तीव्र टीका केली.
कोरेगाव पोलीस ठाणे आणि प्रभारी अधिकारी घनश्याम बल्लाळ यांच्या कारभाराची तातडीने सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हा प्रश्न रस्त्यावर नेण्याचा इशाराही आ. शशिकांत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे दिला.