सातारा : येथील सेव्हन स्टार इमारतीमधील अंबिका मोबाईल शॉपी मध्ये गर्दीचा फायदा घेऊन नवीन मोबाईल चोरी करणार्या परप्रांतीय महिलेला सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 19 हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 जून रोजी सेव्हन स्टार येथील अंबिका मोबाईल शॉपी मध्ये एक अनोळखी महिला मोबाईल खरेदीच्या निमित्ताने आली होती. मोबाईल खरेदी करत असताना तिने ओढणीच्या आडून दुकानांमधील नवीन मोबाईलचा बॉक्स लपवला. कोणाच्या लक्षात आले नाही, असे समजून ती तेथून सराईतपणे निघून गेली. रात्री मालाची तपासणी करीत असताना दुकानामधील मोबाईलचा सीलबंद बॉक्स आढळून येत नसल्याचे दुकान व्यवस्थापनाच्या लक्षात आले. हा मोबाईल एका अनोळखी महिलेने चोरल्याचे लक्षात आल्यावर दुकान मालकांनी सातारा शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांच्यासह पथकाने खबर्याच्या माध्यमातून या महिलेची माहिती प्राप्त केली. ती महिला कर्नाटक राज्यातील असून यापूर्वी देखील तिने सोन्याच्या दुकानांमध्ये हातचलाखी करून सोने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. ती महिला चोरी करून कर्नाटक राज्यात पळून जात असल्याचीही माहिती उपलब्ध झाली. तसेच या गुन्ह्यातील महिला कोरेगाव येथे आढळून आल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना प्राप्त झाली. डीबी पथकाने महिला पोलिसांच्या मदतीने तिचा ठावठिकाणा शोधून तिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांच्या स्टाईलने चौकशी सुरू झाल्यावर तिने मोबाईल चोरल्याचे कबूल केले. 19 हजार रुपये किंमतीचा मोबाईल तिच्याकडून हस्तगत करण्यात आला.
या तपासामध्ये पोलीस हवालदार सुजित भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रिटे, इरफान मुलांणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सुहास कदम यांनी सहभाग घेतला.