सातारा : आयुष विभागाअंतर्गत जिल्हा रुग्णालयात 11 फेब्रुवारी रोजी जागतिक युनानी दिवस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक मेजर डॉ. राहुलदेव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ सुभाष कदम, डॉ. मोहोळकर, डॉ. राहुल जाधव, डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. सलमा इनामदार, डॉ. विजया जगताप, डॉ. वैद्य, डॉ. बढिये, डॉ. राजमाने, अधिसेविका श्रीमती कालसेकर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिथुन पवार, सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संजिवनी शिंदे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व हकीम अजमल खान यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
हकीम अजमल खान यांच्या जयंती निमित्त दरवर्षी ११ फेब्रुवारी हा दिवस जागतिक युनानी दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. हकीम अजमल खान हे स्वातंत्र्य सेनानी होते तसेच भारतामध्ये युनानी व आयुर्वेद चिकित्सेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांचे महत्वाचे योगदान होते. युनानी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
यावेळी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी आयुर्वेद, होमिओपॅथी, योग व युनानी चिकित्सापध्दती ह्या प्राचीन उपचार पध्दती असुन त्यांचा अनेक रुग्णांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे. बऱ्याच आजारांमध्ये ही चिकित्सापध्दती उपयोगी असल्याचे विशद केले. आयुषचिकित्सा पध्दतीचा लाभही जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. आयुष विभागामध्ये दररोज सायं ५ वाजता सुर्यनमस्कार व योगा सत्र सुरु आहे, तरी सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. याप्रसंगी युनानी चिकित्सक डॉ. आफशा तरन्नुम खान यांनी युनानी चिकित्सा पध्दतीची माहिती देताना अर्श, भगंदर, त्वचाविकार, मुतखडा इत्यादी आजारामध्ये युनानी चिकित्सेने यशस्वी उपचार करण्यात येत आहेत, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संजीवनी शिंदे (सहा. जिल्हा आयुष अधिकारी) यांनी केले. डॉ. मिथुन पवार (जिल्हा आयुष आधिकारी) यांनी प्रस्ताविक केले. डॉ. अभिजित भोसले (होमिओपॅथी वैद्यकीय अधिकारी) यांनी आभारप्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी डॉ. कीर्तिकुमार घेवरी, डॉ. विनोद ताबंवेकर, पुरब आनंदे. प्रियांका जाधव, शिल्पा बागल, निलम साळुंखे, असिफ आत्तार, तुषार माळी, पृथ्वीराज गायकवाड, अमोल कांबळे, निलेश घोडके यांनी प्रयत्न केले.