सातारा : डिसेंबर महिन्यात जावळी तालुक्यातील एका हॉटेलमध्ये महिला नाचवत असताना झालेल्या वाद मनात ठेवून पाच जणांनी दोघांचा काटा काढण्याचा डाव आखला होता. त्यातुन दोघांनी दुचाकीवरून पाठलाग करत कोंडवे येथील पेट्रोल पंपाच्या जवळ पिस्टलमधून फायरिंग केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्या प्रकरणी एका संशयिताला याआधी तालुका पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी सुरू केली आहे. त्याच गुन्ह्यात आणखी तिघांच्या मुसक्या कोल्हापूर येथील पन्हाळा परिसरातून सातारा तालुका पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्या अटकेची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
श्रेयस अनिल पवार (21, रा. जकातवाडी), साई विजय नलवडे (वय 19, रा. मंगळवार पेठ), दीपक रामाज्ञ चौरसिया (वय 19, रा. जकातवाडी ता.सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी, सातारा तालुक्यातील कोंडवे येथे सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. घटना घडताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा घटनेची पार्श्वभूमी त्यांच्या समोर आली. जावळी तालुक्यातील जय मल्हार या हॉटेल मध्ये बारबाला नाचवताना डिसेंबर महिन्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून पाच जणांनी अमर पवार आणि श्रेयस भोसले यांच्यावर गोळीबार करून त्यांचा गेम करण्याचा प्लॅन आखला होता.
मेढा पोलीस ठाण्यात हजेरी झाल्यानंतर या गेमसाठी तीन जण कार मधून, तर दोघे दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत होते. कोंडवे येथील पेट्रोल पंपाच्या जवळ आल्यानंतर दुचाकीवरील दोघांनी अमर पवार आणि श्रेयस भोसले या दोघांच्या दिशेने गोळीबार करून ते पळून गेले. जखमींवर उपचार सुरू असून सातारा तालुका पोलिसांनी या प्रकरणी याआधीच एकास अटक केली होती. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीही सुनावली आहे. मात्र, प्रत्यक्ष गोळीबार करणारे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्यांच्या शोधासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी स्वतंत्र पथके तयार करून कोल्हापूर आणि पुण्याच्या दिशेने पाठवली होती. त्यातल्या एका पथकास बुधवारी यश आले असून कोल्हापूरातील पन्हाळा परिसरातून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या अटकेची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अशारितीने कोंडवे गोळीबार प्रकरणी आतापर्यंत चारजणांना अटक करण्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले आहे.