शेंद्रे येथे अवैध दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ४१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 02 May 2026


सातारा  : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे (ता. सातारा) येथे सापळा रचून गोवा बनावटीच्या विदेशी मद्य व बिअरची अवैध वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत एकूण ४१ लाख ७५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शुक्रवारी (दि. १) मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेले गोवा निर्मित मद्य चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. त्यानुसार भरारी पथकाने शेंद्रे परिसरात नाकाबंदी करत संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी अशोक लेलँड कंपनीचा चौदाचाकी ट्रक (क्र. एमएच-१२ पीक्यू-९२७२) अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला.

ट्रकमधून १,४७७.४४ बल्क लिटर विदेशी मद्य (१७१ बॉक्स) तसेच ६०० बल्क लिटर बिअर (५० बॉक्स) असा एकूण २२१ बॉक्स जप्त करण्यात आला. जप्त मद्याची किंमत २० लाख ७७ हजार २०० रुपये असून ट्रक व इतर साहित्यांसह एकूण मुद्देमाल ४१ लाख ७५ हजार ७६० रुपये इतका आहे.

या प्रकरणी पारस अमेदाराम जाट (वय २६, रा. बाडमेर, राजस्थान) व अजय धनराज पाटील (वय ३०, रा. पिंपळनेर, जि. धुळे) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे व विभागीय उपआयुक्त विजय चिचांळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या नेतृत्वात पार पडली. निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, पांडुरंग कुंभार, सोमनाथ माने तसेच जवान सागर आवळे, अजित रसाळ, अरुण जाधव व बाळासो पापुंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

दरम्यान, जिल्ह्यात बनावट किंवा अवैध दारूची निर्मिती, विक्री अथवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी तत्काळ उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड-पाटण रोडवर अवैध शस्त्रांसह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई;
पुढील बातमी
नसरापूर अत्याचार प्रकरण: पीडितेच्या नातेवाईकांचा नवले पुलावर ठिय्या, पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला

संबंधित बातम्या