सातारा : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाच्या वतीने येथील शासकीय बाल सुधारगृह (रिमांड होम) मधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. युवक जिल्हाध्यक्ष समीर घाटगे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, तसेच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, या सामाजिक भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र पर्वावर बाल सुधारगृहातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष समीर घाटगे, युवा नेते साहिलबाबा शिंदे, प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, किसान सेलचे अध्यक्ष अतुल शिंदे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख, विक्रांत शिर्के, तेजस जाधव, उदय जाधव, मंगेश ढाणे, किरण पाटील, श्रीजीत पाटील यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.