सातारा : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेंतर्गत विभागीय प्रदर्शन आणि अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य महोत्सव येत्या शनिवारपासून नऊ मार्च या कालावधीत येथील पोलिस कवायत मैदानावर आयोजिण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी दुपारी चार वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होईल. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयंत आजगावकर, आमदार अरुण लाड, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार महेश शिंदे, आमदार सचिन पाटील यांच्यासह कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची
प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता खरेदीदार विक्रेता यांचे संमेलन होणार आहे. या वेळी फाउंडेशनच्या संस्थापिका नक्षत्र अध्यक्षा दमयंतीराजे भोसले, कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रिया शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आखाती देशातील बाजारपेठ आणि निर्यात संधी या विषयावर देशी मार्ट फूड स्टाफ ट्रेडिंग कंपनीचे सुनील महांगडे, अन्न पदार्थातील पोषणमूल्य व अन्न भेसळ ओळखणे या विषयावर प्रा. पांडुरंग धुरे, कांदा व हळद निर्यात विषयावर अष्टभैरव फार्मर कंपनीचे सागर जाधव, आरोग्य धनसंपदा देशी वाणाचे महत्त्व व सोशल मीडियाद्वारे धान्याची विक्री या विषयावर संतोष बोबडे हे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रदर्शनास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन फरांदे यांनी केले आहे.