यापुढे विधानसभा, लोकसभाही बॅलेटवरच घेण्याच्या सूचना पंतप्रधानांनी निवडणूक आयोगाला करावी - जयंत पाटील यांची मागणी

by Team Satara Today | published on : 28 October 2026


पुणे : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही यापुढे बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला कराव्यात, अशी थेट मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. विधानपरिषद निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान झाल्यावर जनतेने विरोधी पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. यावरून वाढती बेकारी, महागाई आणि तरुणांच्या प्रश्नांवरून सरकारविरोधात असलेली तीव्र चीड स्पष्टपणे सिद्ध झाली असल्याचे त्यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या आहेत. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅलेट पेपर संदर्भात केलेल्या विधानाचे स्वागत करताना जयंत पाटील म्हणाले की, बॅलेटवर निवडणुका घेण्यास आता कोणतीही हरकत नाही. ३० तासांहून अधिक काळ चाललेल्या मतमोजणी प्रक्रियेवर प्रशासनाला दोष न देता, पसंतीक्रमाची मते आणि मोठी मतपत्रिका असल्यामुळे हा वेळ लागणे स्वाभाविक होते, असे त्यांनी स्पष्ट केले. पदवीधर मतदारसंघात मतदारांनी आमिषांना बळी न पडता निर्धाराने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.
हर्षदा देशमुख यांचा विजय आणि तरुणांवरील विश्वास
शरद पवार यांनी नव्या पिढीतील उच्चशिक्षित युवा कार्यकर्त्या हर्षदा देशमुख यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरला असून, १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा मोठ्या फरकाने पार करत त्यांचा विजय निश्चित झाला आहे, असा आनंद त्यांनी व्यक्त केला. यावेळी नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख यांनी पदवीधरांचे प्रश्न मांडताना सांगितले की, महागाई, बेरोजगारी आणि एमपीएससी परीक्षांमधील पारदर्शकता हे कळीचे मुद्दे आहेत. पदवीधरांना सक्षम करण्यासाठी आणि नवउद्योजकांना पाठबळ देण्यासाठी पाचही जिल्ह्यांत 'स्मार्ट ग्रॅज्युएट' उपक्रम राबवून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.
सरकारने जाहीर केलेली ५ हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी
कोल्हापूरमध्ये सतेज (बंटी) पाटील आणि गोकुळ दूध संघाच्या निर्णयामुळे वातावरण अधिक सकारात्मक झाल्याचे सांगत जयंत पाटील यांनी आभार मानले. याशिवाय शिक्षक मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत, जयंत आसगावकर यांनी उत्तम लढत दिल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, दुष्काळात सरकारने जाहीर केलेली ५ हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असून ती वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच रायगड परिसरातील वीज प्रकल्पातील वृक्षतोडीवरून पश्चिम घाटातील जैवविविधता धोक्यात येऊ नये म्हणून पर्यावरण विभागाकडून स्पष्टीकरणाची गरज व्यक्त करत, जय पवार यांच्या अपघाताचा सीआयडी तपास तातडीने पूर्ण करून अहवाल जनतेसमोर आणावा, अशी मागणीही त्यांनी केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अचानक चक्कर आल्याने रत्नागिरीत अभियांत्रिकी महाविद्यालयाचा कराड तालुक्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू
पुढील बातमी
सातारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी आवाहन

संबंधित बातम्या