कोल्हापूर : जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर दुचाकी आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन निष्पाप मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
दीपक चांदे (वय ३९), शोभा दीपक चांदे (वय ३५), जय दीपक चांदे (वय १०) आणि पूर्वा दीपक चांदे (वय ७) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे व्होन्याळी गावचे असणारे चांदे कुटुंब हे नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास होते. उन्हाळी सुट्ट्या घालवण्यासाठी ते सर्वजण आपल्या गावी आले होते. गावात त्यांनी नुकतेच एक नवीन घर बांधले होते. या नवीन घरात पहिल्यांदाच आठ दिवस राहण्याचा आनंद घेण्यासाठी हे संपूर्ण कुटुंब मुंबईहून गावी आले होते. सुट्ट्या संपवून हे कुटुंब उद्या पुन्हा मुंबईला परतणार होते.
मुंबईला निघण्यापूर्वी नातेवाइकांना आणि पाहुण्यांना भेटण्यासाठी चांदे कुटुंब दुचाकीवरून दुंडगे गावाकडे निघाले होते. मात्र, उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर जात असताना त्यांच्या दुचाकीला एका टेम्पोने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चौघांचाही घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला. उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने व्होन्याळी गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. पोलिस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.