धक्कादायक! महाराष्ट्राच्या राजकारणातील 'दादा' हरपला

अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत ; संपूर्ण राज्यावर शोककळा

by Team Satara Today | published on : 28 January 2026


बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक स्वभावाने आणि प्रशासनावरील जबरदस्त पकडीने 'दादा' म्हणून ओळख निर्माण करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे एका भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. या घटनेने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण हादरून गेले आहे. नियतीने असा काही डाव साधला की, ज्या बारामतीने त्यांना भरभरून प्रेम दिले, त्याच बारामतीच्या मातीत त्यांच्यावर काळाने झडप घातली. अजित पवारांचे निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा निर्माण झाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार, २८ जानेवारी) सकाळी अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे येत होते. सकाळी ८:४५ च्या सुमारास त्यांचे VT-SSK हे खाजगी चार्टर्ड विमान (Learjet 45) बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. लँडिंगच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवरून घसरले आणि काही क्षणातच आगीच्या लोळात भस्मसात झाले. या भीषण दुर्घटनेत अजितदादांसह विमासातील दोन वैमानिक आणि दोन सुरक्षा रक्षक अशा एकूण ५ जणांचा जागीच कोळसा झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामतीसह साताऱ्यातही शोककळा पसरली आहे. साताऱ्याशी अजितदादांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यामुळे सातारकरांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.​जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दादा आज बारामतीत चार सभा गाजवणार होते. पण त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली. "सकाळी ७ वाजता कामाला लागणारा नेता" अशी ओळख असणाऱ्या अजितदादांचा प्रवास असा अर्ध्यावर संपेल, असे कुणालाही स्वप्नातही वाटले नव्हते. महाराष्ट्राच्या विकासाचा एक कणखर कणा आज निखळला आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून न येणारी आहे. सातारा टुडे परिवार अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वर तालुक्यात चुरशीचा सामना रंगणार; गटात व गणात २१ जण रिंगणात
पुढील बातमी
अजितदादांच्या अकाली एक्झिटने जिल्ह्यात राजकीय सन्नाटा; दोन्ही राष्ट्रवादी कार्यालयाकडून दादांना श्रद्धांजली; तीन दिवसाचा दुखवटा जाहीर

संबंधित बातम्या