पशुसंवर्धन विभागातर्फे विंग येथे पशुपालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम; जनावरांचे आरोग्य व उत्पादनक्षमता वाढविण्यावर भर

by Team Satara Today | published on : 15 October 2026


सातारा : निकृष्ट चारा पौष्टिक बनवून त्याचा जनावरांसाठी प्रभावी वापर करता यावा, या उद्देशाने राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना, विंग यांच्या वतीने युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सोयाबीनच्या वाळलेल्या भुसकटावर युरिया प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पशुपालकांना दाखविण्यात आले.
या कार्यक्रमास पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. नामदेव पवार, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच येरवळे येथील पशुपालक राहुल लोकरे उपस्थित होते. येरवळे, विंग, चचेगाव, शिंदेवाडी आणि घारेवाडी या गावांतील पशुपालकांनी प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
प्रशिक्षणादरम्यान उपलब्ध निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी युरिया प्रक्रिया कशी करावी, याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास उपलब्ध चाऱ्याचा अधिक कार्यक्षम वापर करता येऊ शकतो. परिणामी, जनावरांच्या आहार व्यवस्थापनात सुधारणा करून त्यांचे आरोग्य आणि उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत होऊ शकते.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या कृषी अवशेषांचा योग्य वापर करून पशुखाद्याची उपलब्धता वाढविणे महत्त्वाचे आहे. अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाची माहिती पशुपालकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.
कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पशुपालक राहुल लोकरे यांचे तसेच मार्गदर्शन करणारे मान्यवर, सहकार्य करणारे अधिकारी-कर्मचारी आणि सहभागी पशुपालकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तरडगाव येथे वाहनचालक परवाना चाचणी शिबिरास प्रारंभ; सेवा संकल्प अभियानांतर्गत फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम; दर महिन्याला तीन वेळा शिबिराचे आयोजन

संबंधित बातम्या