सातारा : सातारा शहरात बुधवारी पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. तसेच गौराईचे दोन दिवसाचे स्वागत झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिला पारंपारिक पद्धतीने निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, च्या जयघोषाने सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये हे जयघोष ऐकायला येत होते.
सातारा पालिकेने भवानी तलाव, बुधवार नाका येथील कृत्रिम तलाव, दगडी शाळा येथील पाण्याची कुंड, गोडोली येथील कृत्रिम तलावामध्ये व हुतात्मा उद्यान परिसरात विसर्जनाची सोय केली होती .सातारा जिल्ह्यात एका आकडेवारीनुसार घरगुती 15000 हून अधिक घरगुती गणरायाचे विसर्जन झाले.
सातारा शहरामध्ये गेल्या सात तारखेपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस गणरायाच्या मुक्कामानंतर त्याचे विसर्जन केले जाते. पाच दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन तळ्यावर आलेल्या अनेक कुटुंबातील सदस्यांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. सातारा नगरपालिकेचा जलतरण तलाव, हुतात्मा स्मारक व बुधवार नाका येथील कृत्रिम तळे, दगडी शाळा येथील कृत्रिम तळे, तसेच गोडोली आयुर्वेदिक गार्डन परिसरात असलेले कृत्रिम तळे, याशिवाय माहुली येथील कृष्णा घाटावर दुपारनंतर घरगुती गणपतीचे पारंपारिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. गणेश भक्तांच्या सोयीसाठी सातारा पालिकेने विसर्जन तळ्यावर चार लाइफ गार्ड व 34 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. तसेच सातारा शहरात 14 ठिकाणी निर्माल्य कुंड आणि पाण्याचे कुंड गणरायाच्या विसर्जनासाठी ठेवण्यात आले होते.
माहुली येथील कृष्णा घाटावर भक्तीमय वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. कृत्रिम तळे बुधवार नाका व भवानी तलाव येथे सातारा शहरातील नागरिकांची विशेष गर्दी होती. या दोन्ही कृत्रिम तळ्यावर प्रत्येकी आठ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय करण्यात आली आहे. सातारा पालिकेच्या वतीने नियंत्रक अधिकारी म्हणून दिलीप चिद्रे यांची नेमणूक होती. सकाळी दहा ते रात्री 10 या काळात पुरेसे मनुष्यबळ वेगवेगळ्या विसर्जन स्थळावर तैनात होते. मंगळवारी आगमन झालेल्या ज्येष्ठा गौरीना बुधवारी घरोघरी पंचपक्वान्नाचे भोजन देण्यात आले. अनेक कुटुंबीयांतर्फे सुहासिनींना दर्शन प्रसादासाठी आमंत्रित करण्यात आले होते. अनेक ठिकाणी महालक्ष्मीची सुंदर आरास करण्यात आली होती.
यानंतर गुरुवारी जेष्ठा गौरींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. गौरींचे मुखवटे पुढच्या वर्षी साठी संग्रहित करून गौरीच्या रूपाने असणाऱ्या खड्यांचे विसर्जन करण्यात आले. पाच दिवसाच्या गणपती-गौरी विसर्जनानंतर सातारा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आता गर्दी होणार आहे. साताऱ्यात बहुतांश मंडळांनी भव्य गणेश मूर्ती, तर काही निवडक गणेश मंडळांनी जिवंत देखावे सादर केले आहेत. विशेषतः फुटका तलाव येथील गणेशोत्सव मंडळ व शनिवार पेठेतील बाल गणेशोत्सव मंडळ यांच्या देखाव्यांचे विशेष आकर्षण राहणार आहे.
पाच दिवसाच्या बाप्पांना गौरीसह भावपूर्ण निरोप
शहरात पाच ठिकाणी विसर्जन तळी सज्ज
by Team Satara Today | published on : 12 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा