एफडीएची राज्यभरात भेसळखोरांवर मोठी कारवाई; १२.७४ कोटींचा माल जप्त, ६८ दुकानांचे परवाने रद्द

by Team Satara Today | published on : 25 October 2026


मुंबई : सणासुदीच्या काळात बाजारपेठेत होणारी अन्नपदार्थांची भेसळ तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या खाद्य आणि औषध प्रशासनाने राज्यभरात मोठी धडक मोहीम राबवली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत अधिकाऱ्यांनी राज्यभरातून तब्बल १२.७४ कोटी रुपये मूल्याचा भेसळयुक्त, निकृष्ट, मुदत संपलेला आणि प्रतिबंधित माल जप्त केला आहे.
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या 'फेस्टिव्ह क्रँकडाऊन' मोहिमेत अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या ६८ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय ७ दुकानांना थेट काम बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले असून अन्नसुरक्षा कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत ४ दुकानांकडून १.३० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या मोहिमेदरम्यान प्रशासनाने मोठी कारवाई करत ३ लाख ७४ हजार ७५२ किलो आणि २८ हजार २९७ लिटर असा एकूण ९.११ कोटी रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. यात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे आणि चुकीचे लेबलिंग केलेले अन्नपदार्थ समाविष्ट होते. याशिवाय, नष्ट करण्यासाठी ठेवलेला, मात्र बेकायदेशीरपणे पुन्हा बाजारात विकण्यासाठी आणलेला ८,३९२ किलो मुदत संपलेला (४८.०९ लाख रुपये) माल पकडला गेला.
कोल्ड स्टोरेजवर छापे, ४.१९ कोटींचा साठा जप्त
सणासुदीच्या काळात वाढत्या मागणीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर एफडीएने करडी नजर ठेवली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून दोन मोठ्या कोल्ड स्टोरेजवर कारवाई करत एकाच दिवसात १,९७,४८० किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत ४.१९ कोटी रुपये आहे.
गुटखा, तंबाखूविरोधात कठोर कारवाई; २० जणांना अटक
राज्यभरात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह ३.१५ कोटींचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी २२ एफआयआर नोंदवण्यात आले असून २० जणांना अटक करण्यात आली आहे. सर्वात मोठी कारवाई पालघर येथे झाली, जिथे एकट्या पालघरमधून १.५१ कोटींचा माल जप्त करण्यात आला. याशिवाय जालना, मुंबई, नाशिक आणि धाराशिवमध्येही मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.
सणासुदीच्या काळात ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. यापुढील काळातही राज्यभरात तपासणी, नमुने घेणे आणि धडक कारवाईची मोहीम अशीच तीव्रतेने सुरू राहील, असे आवाहन एफडीएने ग्राहकांना केले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषदेत डिजिटल प्रणालीचा अवलंब; ऑनलाईन पेन्शन प्रदान करणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद
पुढील बातमी
चार दिवसांत नदी प्रवाही न झाल्यास कोयना धरणाचे उघडू; राजू शेट्टी यांचा इशारा;भिलवडी येथे कृष्णा नदीपात्रात सर्वपक्षीय आंदोलन

संबंधित बातम्या