सातारा : दि. 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक संचालनालया द्वारे बाळ कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम वाहतो ही स्मृतींची जुडी हा कार्यक्रम शाहू कलामंदिर येथे सायंकाळी 6.30 वा. आयोजित केला आहे.
बाळ कोल्हटकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी तसेच सातारच्या मातीत जन्माला आलेल्या एका हरहुन्नरी कलाकाराचा जीवनपट सातारकरांसमोर उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे.
नाटककार, कवी, अभिनेते व नाट्यदिग्दर्शक या सगळ्या प्रकारात बाळ कोल्हटकरांचा हातखंडा होता. त्यांनी लिहिलेल्या दुरितांचे तिमिर जावो या नाटकांचे पंधराशे प्रयोग, वाहतो ही दुर्वाची जुडी या नाटकाचे चौदाशे प्रयोग, मुंबईची माणसे याचे जवळपास दोन हजाराच्या वर, तर एखाद्याचे नशीब या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी 30 हून अधिक नाटके लिहिली.
वाहतो ही स्मृतींची जुडी या कार्यक्रमात विजय गोखले, संतोष पवार, गणेश रेवडेकर, डॉ. श्रीराम पंडित, अमोल बावडेकर, विक्रम गायकवाड, अमृता रावराणे यांच्या सोबतच सातार्याचे संतोष पाटील हे दिग्गज कलावंत सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन महेंद्र कदम यांचे आहे, लेखन ऋषिकेश परांजपे यांची आहे. तसेच निर्मिती प्रमुख म्हणून गणेश रेवडेकर यांनी काम पाहिले आहे.
हा कार्यक्रम सर्व शाहुवासीयांसाठी शासनाच्या वतीने विनामूल्य असणार आहे. तरी भरपूर संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जेष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण शिंदे, गणेश रेवडेकर व कोल्हटकर कुटूंबियांनी केले आहे.