सातारा नगरीचे नाव शाहूनगरी असे करावे - विनोद कुलकर्णी

शाहूमहाराज (थोरले) यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

by Team Satara Today | published on : 15 December 2025


सातारा :  भारताच्या इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योध्दा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता, मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर छत्रपती शाहू यांनी महत्त्वपूर्ण ठसा उमटवला असून सातारा त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले. सातारा नगरीचे नाव शाहूनगरी असे करावे, अशी मागणी मावळा फाउंडेशनचे अध्यक्ष व ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केली.

हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे चौथे छत्रपती, सातारा नगरीचे संस्थापक, स्वराज्यविस्तारक शाहू महाराज (थोरले) यांच्या २७६ व्या पुण्यातिथीनिमित्त संगम माहुली येथील त्यांच्या समाधीस्थळी मावळा फाउंडेशनच्या पुढाकाराने झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. पुण्यतिथीबरोबरच शाहू महाराजांचा जयंती सोहळाही दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय मावळा फाउंडेशनच्यावतीने घेण्यात आला. अभिवादन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते, जनता बँकेचे संचालक माधव सारडा, ॲड. चंद्रकांत बेबले, वजीर नदाफ, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आणि मान्यवर उपस्थित होते. फाउंडेशनच्या आणि शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा विनोद कुलकर्णी यांनी घेतला. नगरपालिकेच्या होणाऱ्या नवीन कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ शाहू महाराजांचा पुतळा बसवावा, या गेल्यावर्षी केलेल्या मागणीची दखल घेत पालिकेच्या नवीन कार्यालयात शाहू महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे ही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. सातारकरांनी नगराध्यक्षपदी संधी दिल्यास सर्वप्रथम छत्रपती शाहूंच्या समाधीस्थळावर नतमस्तक होऊन त्यानंतरच नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे अमोल मोहिते यांनी जाहीर केले. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून संगम माहुली घाट परिसराचे सुशोभिकरण कामाचा प्रारंभ लवकरच होणार असून त्यामध्ये शाहू महाराज समाधी परिसराचेही सुशोभिकरण होणार असल्याचे अमोल मोहिते यांनी सांगितले. नंदकुमार सावंत यांनी सूत्रसंचालन केले. ॲड.चंद्रकांत बेबले यांनी आभार मानले. प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची समाप्ती झाली. याप्रसंगी राजेश जोशी, अमर बेंद्रे, गुजराथी अर्बनचे व्यवस्थापक सतीश घोरपडे, निलेश कुमठेकर, मंगेश गोगावले, तुषार महामूलकर, सचिन सावंत, संगम माहुलीचे उपसरपंच अविनाश कोळपे, संगम माहुलीचे ग्रामस्थ, जनता बँक, गुजराथी अर्बनचे सर्व संचालक, कर्मचारी, मावळा फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि सातारकर उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नाशिकचे तपोवन वाचवण्यासाठी साताऱ्याचे भूमिपुत्र सरसावले; जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा
पुढील बातमी
चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सच्या रस्त्यावर ट्रॅक्टरखाली चिरडल्याने एकचा मृत्यू

संबंधित बातम्या