कोकण व सातारा जिल्ह्यामधील दळणवळण अधिक सुलभ करणारा ‘केबल स्टेड स्काय ब्रिज’ पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर; पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता

by Team Satara Today | published on : 18 June 2026


सातारा : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमधील दळणवळण अधिक सुलभ करणारा, तसेच पर्यटन व उद्योग क्षेत्रासाठी नवे क्षितिज खुले करणारा महत्त्वाकांक्षी ‘केबल स्टेड स्काय ब्रिज’ आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा हा भव्य पूल पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली. मुंबईतील प्रसिद्ध वरळी सी-लिंकच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या पुलासाठी सुमारे १७५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

६४० मीटर लांबी आणि १४ मीटर रुंदी असलेल्या या स्काय ब्रिजमुळे खेड ते महाबळेश्वर दरम्यानचे अंतर तब्बल ५० किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना पोलादपूरमार्गे आंबेनळी घाटातून करावा लागणारा मोठा फेरा टळणार असून वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे. तापोळा परिसरातून कोकणातील गाढवली-आहिर भागाला जोडणारा हा पूल कोयना बॅकवॉटर परिसरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

या भव्य पुलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेली ४३ मीटर उंचीची आकर्षक व्ह्यू गॅलरी. येथे जाण्यासाठी अत्याधुनिक कॅप्सूल लिफ्ट तसेच स्वतंत्र जिन्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणावरून पर्यटकांना कोयना बॅकवॉटर, सह्याद्रीच्या नयनरम्य पर्वतरांगा तसेच मोहक सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सहकाराचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी - पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा कारखान्यात संस्थापक पॅनेलला ताकदीने मदत करा, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

संबंधित बातम्या