मेढा : महाबळेश्वरची ओळख असलेले स्ट्रॉबेरी पीक आता वेगाने जावळी तालुक्यातही विस्तारत असून, यंदाच्या हंगामात जावळी तालुका स्ट्रॉबेरी लागवडीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट लागवडीकडे वळत असल्याने तालुक्यातील शेती क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
महाबळेश्वरला देशातील स्ट्रॉबेरीची पंढरी म्हणून ओळख मिळाली आहे. येथील हवामान, जमीन आणि पाणी यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनाला पोषक वातावरण मिळते. हाच फायदा जावळी तालुक्यातील अनेक भागांनाही होत असल्याने गेल्या काही वर्षांत येथे स्ट्रॉबेरी लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. यंदा जावळी तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांटची लागवड होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्ट्रॉबेरीच्या आधुनिक आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची मागणी वाढली असून, इटली, स्पेन आणि कॅलिफोर्निया येथून आणलेल्या तब्बल १४ विविध जातींचे मदर प्लांट सध्या महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात दाखल झाले आहेत. या जातींमधून अधिक दर्जेदार व रोगप्रतिकारक रोपे तयार होत असल्याने शेतकरी त्यांना प्राधान्य देत आहेत.
सध्या तालुक्यात मदर प्लांट लागवडीसाठी शेत तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेतामध्ये प्लास्टिक मल्चिंग, ठिबक सिंचन व्यवस्था, सेंद्रिय खतांचा वापर तसेच रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उभारल्या जात आहेत. पुढील काही दिवसांत मदर प्लांटची लागवड सुरू होणार असून त्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर तयारी करत आहेत.
मदर प्लांट लागवडीनंतर त्यापासून निर्माण होणाऱ्या रनर्सच्या माध्यमातून नवीन रोपे तयार केली जातात. ही रोपे महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये विकली जातात. त्यामुळे स्ट्रॉबेरी रोपवाटिका व्यवसायाला मोठी आर्थिक उलाढाल मिळते. एका एकरात साधारणपणे दोन ते अडीच लाख रोपांची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या रोपनिर्मिती व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
यंदा एका मदर प्लांटची किंमत सुमारे ५५ रुपये असून, एका एकरासाठी पाच ते सहा हजार मदर प्लांटची आवश्यकता भासते. त्यानुसार एकरी लाखो रुपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांना करावी लागत आहे. मात्र तयार होणाऱ्या रोपांना बाजारात मोठी मागणी असल्याने ही गुंतवणूक फायदेशीर ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
स्ट्रॉबेरी लागवडीमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही चालना मिळत आहे. विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणावर काम उपलब्ध होत आहे. सध्या शेतामध्ये पिशव्या भरणे, माती तयार करणे, रोपांची निगा राखणे आणि लागवडीपूर्व तयारी अशी विविध कामे सुरू असून महिला शेतमजुरांची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत आहे.
महाबळेश्वरनंतर जावळी तालुका आता स्ट्रॉबेरी रोप उत्पादनाचा नवा हब म्हणून विकसित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार जाती आणि शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद यामुळे आगामी काळात जावळी तालुक्याची ओळखही स्ट्रॉबेरी उत्पादनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे निर्माण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.