सातारा : गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात साथीच्या आजारांचा फैलाव वाढला आहे. या आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हिवताप विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. चार लाखांहून अधिक घरांची तपासणी करत औषध फवारणी सुरू केली आहे. यामध्ये ५९ डेंगीचे रुग्ण, मलेरिया ३९ रुग्ण व १७ चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनीही डासांची उत्पत्ती होणारी डबकी (कंटेनर) नष्ट करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने डेंगीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यानंतर हिवताप कार्यालय व जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दक्षता घेत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला. यामध्ये एकूण एक हजार ७९१ गावांची तपासणी करण्यात आली. चार लाख १८ हजार घरांची तपासणी, ५०६ गप्पी मासे पैदास केंद्र आदींची तपासणी करण्यात आली.
पावसाच्या दिवसात वाढणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी घरातील पिण्याची भांडी नियमित स्वच्छ करा. आठवड्यातून एक दिवस पाण्याची भांडी कोरडी ठेवा. शिवाय घराच्या छतावर किंवा इतर ठिकाणी पाणी साचून ठेवू देऊ नका, साचलेली डबकी वाहती करणे, खिडक्यांना जाळ्या बसविणे, सर्व पाणीसाठ्यांना घट्ट झाकण बसविणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, परिसरातील खराब टायर, फुटके प्लॅस्टिक कॅन नष्ट करण्याच्या सूचना हिवताप कार्यालयाने नागरिकांना केल्या.
जिल्हाभरात साथीच्या आजाराने बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे, तसेच ज्या ठिकाणी डेंगी सदृश रुग्ण आढळत आहेत, त्या ठिकाणी धूर फवारणी व इतर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. घरोघरी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.
- डॉ. संजय कुंभार, जिल्हा हिवताप अधिकारी