कोरेगाव–फलटण रस्त्यासाठी २०८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी; आ. महेश शिंदेंच्‍या पाठपुराव्याला यश

by Team Satara Today | published on : 26 June 2026


कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा रस्ते मार्गाने सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार आ. महेश शिंदे यांनी केला होता. त्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कोरेगाव–फलटण या अत्यंत महत्त्वाच्या रस्‍ते ट्रीमिक्स काँक्रीटीकरणासाठी राज्याच्या पुरवणी अंदाजपत्रकात तब्बल २०८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. चिलेवाडी ते कुमठे फाटा हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर कोरेगाव ते फलटण हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करता येणार आहे. कोरेगाव शहर, बाजारपेठ आणि भाडळे खोऱ्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

यापूर्वी आ. महेश शिंदे यांनी खंडाळा–जयसिंगपूर–शिरोळ या राज्य मार्गाच्या ट्रीमिक्स काँक्रीटीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पिंपोडे खुर्द येथील दोस्ती ढाबा ते कोरेगाव या टप्प्यातील सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. कोरेगाव ते रहिमतपूर रस्त्याचे कामही वेगाने सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर कोरेगाव ते वाठार स्टेशन हा प्रवास कमी वेळात होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला व शेतीमाल पुणे, मुंबई, नाशिक आणि चाकणसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये कमी वेळेत पोहोचवणे शक्य होणार आहे.

उत्तर-पूर्व भागातील महत्त्वाचा हिवरे खिंडीचा मार्गही आता पूर्णत्वाकडे जात असून बिचुकले–नलवडेवाडी–हिवरे किन्हई– चंचळी– खेड–नांदगिरी–तडवळे–कोरेगाव हा मार्ग सुरू झाल्यानंतर कोरेगाव ते वाठार स्टेशन हे अंतर अवघ्या वीस मिनिटांवर येणार आहे.

रस्ते विकासाबरोबरच पाणी प्रश्‍नांवरही आ. महेश शिंदे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत कृष्णा नदीचे पाणी रामोशीवाडी, भाडळे तलाव, नलवडेवाडी तलाव आणि तळहिरा तलावापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. यातून २२ हजार ५०० हेक्टर ऊसाचे नवीन क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे विशेषतः भाडळे खोरे आणि उत्तर भागातील पाणीटंचाईचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे.

कोरेगाव, वाई, वाठार स्टेशन, लोणंद, फलटण आणि कराड या प्रमुख शहरांना दर्जेदार रस्त्यांद्वारे जोडण्याचे नियोजन पूर्णत्वाकडे जात असून प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. या प्रकल्पांमुळे कोरेगाव शहराची बाजारपेठ पुन्हा एकदा व्यापारीदृष्ट्या सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रस्ते आणि पाणी या दोन्ही मूलभूत प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू झाल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग राष्ट्रीय स्पर्धेत पाटण तालुक्यातील ३ शाळांचा डंका; जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे कौतुक
पुढील बातमी
संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

संबंधित बातम्या