सातारा : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाबला जिवंत पकडण्यासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता शौर्य गाजविणारे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दशकाहून अधिक काळ उलटूनही स्मारकाचे काम पूर्ण झालेले नसताना, त्यासाठी मंजूर निधीच्या विनियोगावरून आता वाद निर्माण झाला आहे. निधीच्या व्यवहारात कमिशनखोरी आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप शहीद ओंबळे यांच्या कन्या वैशाली ओंबळे यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. विद्यमान स्मारक समिती बरखास्त करून नव्याने समिती स्थापन करावी, तसेच निधीच्या वापराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्मारक उभारणीसाठी शासनाकडून सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी दोन कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्यक्षात स्मारकाचे काम अद्याप अपूर्ण आहे. प्राप्त निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या व्यवहारांमध्ये कमिशन दिले-घेतले गेल्याची माहिती संबंधितांकडून मिळाल्याचा दावा वैशाली ओंबळे यांनी केला.
या प्रकरणात चर्चेत असलेल्या एकनाथ ओंबळे यांच्या नातेसंबंधांबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. ते वडिलांचे सख्खे बंधू नसून दूरचे नातेवाईक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नात्यापेक्षा शहीदाच्या स्मारकाच्या कामातील पारदर्शकता महत्त्वाची आहे. गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना समितीत ठेवणे योग्य नाही. त्यामुळे चौकशी आणि कारवाई होईपर्यंत स्मारकाचे काम थांबवावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पालकमंत्र्यांची भेट अद्याप होऊ शकलेली नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ओंबळे कुटुंबाची भूमिका मांडणार असल्याचेही वैशाली ओंबळे यांनी स्पष्ट केले.
देशासाठी बलिदान देणार्या शूरवीराच्या स्मारकाचे काम वर्षानुवर्षे रखडणे आणि त्यासाठीच्या निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण होणे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या आरोपांची शासनाकडून सखोल चौकशी होणार का, समितीची पुनर्रचना होणार का आणि स्मारक प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहीदाच्या स्मारकासाठीचा निधी कुठे गेला? ओंबळे कुटुंबाचा सवाल
13 कोटींचा प्रकल्प रखडला; निधी वितरणात कमिशनखोरी झाल्याचा वैशाली ओंबळे यांचा आरोप, स्मारक समितीच्या पुनर्रचनेची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
by Team Satara Today | published on : 26 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा