मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा तिकिट घेऊन एसटीचा प्रवास

मेढा डेपोत नवीन बसेसच्या लोकार्पण सोहळ्याला तालुक्यातील नागरिकांनी केली गर्दी

सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून एसटी महामंडळाच्या मेढा आगाराला नुकत्याच नवीन ८ एसटी बसेस मिळाल्या. या एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा मेढा आगारात उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तिकीट काढून एसटी बस मधून फेरफटका मारत एसटी प्रवासाचा आनंद लुटला.

बसेसच्या लोकार्पण सोहळ्याला महामंडळाचे सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे, ज्योती गायकवाड यांच्यासह जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी निलेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र भूतकर, शाखा अभियंता सुरेश कुंभार यांनी सुद्धा हजेरी लावली होती. यावेळी मेढा आगार व्यवस्थापक नीता बाबर यांच्यासह आगारातील अधिकारी वाहक, चालक व तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती.

जावली तालुक्यातील बहुतांश भाग हा दुर्गम- डोंगराळ असून या भागातुन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी बसेसचाच पर्याय नागरिकांना निवडावा लागतो. मात्र मेढा आगारातील अनेक बसेस जुन्या झाल्या होत्या त्यामुळे एसटी बसेस बंद होण्याचे प्रकार नेहमी घडत होते. यासाठी तालुक्यातील नागरिकांनी नवीन एसटी बसेस मिळण्याची मागणी वारंवार मेढा आगारकडे तसेच  सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली होती. ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी तालुक्यातील नागरिकांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी नागरिकांच्या मागणीचा पाठपुरावा स्वतः करत राज्य परिवहन विभागाकडे नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या या मागणीला यश मिळाले असून राज्य परिवहन विभागाकडून मेढा आगाराला नवीन आठ बसेस मिळाल्या आहेत. या बसेसचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी फीत कापून एसटी बसेसचे लोकार्पण केले तसेच मंत्रीमहोदयांनी या नवीन बस मधून फेरफटका मारत एसटी प्रवासाचा आनंद लुटला. एसटी प्रवासादरम्यान स्वतः एसटीचे तिकीट काढून त्यांनी हा प्रवास केला. मेढा आगाराला नवीन बसेस मिळाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी तसेच शाळकरी मुलांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, नवीन बसेस मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. मेढा आगाराने बसचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.


मागील बातमी
शहरांची स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा!
पुढील बातमी
परमेश्वराचे चिंतन मन, बुद्धी, चित्त स्थिर ठेवून करा : डॉ. अजित कुलकर्णी

संबंधित बातम्या