महाबळेश्वर तालुक्यात चुरशीचा सामना रंगणार; गटात व गणात २१ जण रिंगणात

by Team Satara Today | published on : 27 January 2026


महाबळेश्वर : तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर 'रिंगणातील' पैलवान निश्चित झाले आहेत. महाबळेश्वरच्या डोंगराळ भागात आता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाची 'मशाल' यांच्यात चुरशीचा सामना रंगणार असून, मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषद गटासाठी 16 पैकी 10 मागे घेण्यात आले. शिल्लक अर्ज 6 व पंचायत समिती गणासाठी  34 मधील 19 मागे घेण्यात आले. एकूण  50 अर्ज दाखल झाले होते त्यातील 29 अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे गटात 6 व गणात 15  अर्ज शिल्लक राहिले आहेत.  तळदेव गटात तिरंगी लढत होत असून येथे काटाजोड सामना पाहायला मिळणार आहे. संजय रामचंद्र गायकवाड (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), अजित रामचंद्र संकपाळ,(शिवसेना), सुभाष महादेव सोंडकर (भाजप) या तिन्ही उमेदवारांनी कंबर कसली आहे.

तळदेव गणात चौरंगी लढत होत आहे. येथे शरद पवार गटाचे अभिषेक आत्माराम शिंदे हे 'मशाल' चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने या गणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्यासमोर संजय शेलार (शिवसेना), गोविंद सकपाळ (भाजप) आणि संजय उत्तेकर (राष्ट्रवादी) यांचे तगडे आव्हान असणार आहे.

कुंभरोशी गणाचे राजकारण यंदा चांगलेच रंगतदार झाले आहे. येथे अधिकृत पक्षांच्या उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे. सचिन उतेकर (राष्ट्रवादी), सुरेश जाधव (भाजप) आणि संजय मोरे (शिवसेना) यांच्यात पक्षीय लढाई असतानाच, समीर मधुकर चव्हाण (चिन्ह: फलंदाज) आणि सनी अशोक मोरे (चिन्ह: बॅट) हे अपक्ष उमेदवार कोणाची 'विकेट' घेणार, याची चर्चा रंगू लागली आहे. मेट गुताड गणातही महिला उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. शकुंतला चोरमले (राष्ट्रवादी), अमिना शारवान (भाजप) आणि वैशाली जाधव (शिवसेना) यांच्यात तिरंगी लढत होत असून, इथला मतदार कोणाच्या पारड्यात वजन टाकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भिलार गटात  'हाय-व्होल्टेज' ड्रामा

पुस्तकांचे गाव असलेल्या भिलारमध्ये राजकीय ग्रंथाचे नवे पान लिहिले जात आहे. भिलार गट: येथे संजय केळगने (राष्ट्रवादी), प्रदीप चपटे (शिवसेना) आणि रंजना संजय कदम (भाजप) यांच्यात थेट संघर्ष आहे. भिलार गण: महिला राजवट असलेल्या या गणात वंदना भिलारे (राष्ट्रवादी), सुप्रिया भिलारे (भाजप) आणि पूनम गोळे (शिवसेना) यांच्यात 'कांटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लाडकी बहीण' योजना कुणीही बंद पाडू शकत नाही; बोंडारवाडी धरण पूर्ण करणारच : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केळघरमध्ये गर्जना

संबंधित बातम्या