सातारा : सातारा जिल्ह्यात दुष्काळाच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी सुरू झालेल्या जलसंधारणाच्या मोहिमेला आता लोकसहभागाची अभूतपूर्व ताकद मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून सुरू झालेल्या वनराई बंधारे उभारणीच्या मोहिमेने अवघ्या पाच दिवसांत 1,000 बंधार्यांचा टप्पा पार केला असून, जिल्ह्यात आतापर्यंत 1,500 हून अधिक वनराई बंधारे पूर्ण झाले आहेत.मात्र, या मोहिमेची खरी ओळख आकडेवारीत नाही; तर गावागावांत पाण्यासाठी एकत्र आलेल्या माणसांमध्ये आहे.
माझ्यासाठी नाही, माझ्या गावासाठी’
कुठे ग्रामस्थ श्रमदानासाठी एकत्र येत आहेत, कुठे युवकांनी पुढाकार घेतला आहे, तर कुठे महिलांनीही जलसंधारणाच्या कामात सहभाग नोंदविला आहे. अनेक ठिकाणी अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थ खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत.पाण्याची समस्या सरकार सोडवेल, या अपेक्षेऐवजी माझ्या गावासाठी मी काय करू शकतो?’ हा विचार आता रुजताना दिसत आहे. हाच या मोहिमेचा सर्वात मोठा विजय आहे.
शाळेच्या वर्गातून थेट नदी-नाल्याकाठी
जलसंधारणाच्या या चळवळीत शालेय विद्यार्थी, हरित सेना आणि स्काऊट-गाईड यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे.पुस्तकात पाणी अडवा, पाणी जिरवा’ शिकणारी मुले आता प्रत्यक्ष नदी-नाल्यांच्या पात्रात उतरून श्रमदान करत आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वनराई बंधारे उभारण्यात सहभाग घेतला असून, जलसंधारणाचा हा प्रत्यक्ष धडा त्यांच्या आयुष्यभराच्या स्मरणात राहणारा आहे.या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून अनेक गावांमध्ये मोठ्यांनीही श्रमदानासाठी पुढाकार घेतला आहे.
एक बंधारा म्हणजे उद्याच्या पाण्याची आशा
वनराई बंधारा छोटा असला तरी त्यामागचा उद्देश मोठा आहे. वाहून जाणारे पाणी अडवणे, ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळी वाढविणे आणि स्थानिक जलस्रोतांना बळकटी देणे, या उद्देशाने ही कामे करण्यात येत आहेत.आज अडवलेला पाण्याचा थेंब उद्या एखाद्या विहिरीला जीवदान देऊ शकतो; एखाद्या शेतकर्याच्या पिकाला आधार देऊ शकतो आणि एखाद्या गावाची पाणीटंचाई कमी करू शकतो.
जलसंधारण आता अभियान’ राहिलेले नाही
सातार्यातील परिस्थितीने एक महत्त्वाचा बदल घडवून आणला आहे. जलसंधारण आता केवळ एखाद्या विभागाचे काम किंवा काही दिवसांचे अभियान राहिलेले नाही.ते गावागावांतून उभे राहणारे जनआंदोलन बनत आहे.वनराई बंधारे, जलतारा, शोषखड्डे, उउढ, ङइड, गाळ काढणे आदी कामांना लोकसहभागाची जोड मिळत असल्याने प्रशासन + लोकसहभाग = जलसुरक्षित सातारा’ अशी नवी दिशा निर्माण होत आहे.
दुष्काळाशी लढण्यासाठी सातार्याची एकजूट!
संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणे आणि जमिनीत जिरवणे, हा सामूहिक संकल्प घेऊन ही मोहीम पुढे नेली जात आहे. 1,500 बंधारे ही सुरुवात आहे; लक्ष्य केवळ बंधारे बांधण्याचे नाही, तर सातार्याला जलसुरक्षित करण्याचे आहे.गावागावांतून आणखी नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि विविध संघटनांनी पुढे येऊन माझे गाव, माझे पाणी, माझी जबाबदारी’ या भावनेतून श्रमदान करावे आणि या जलसंधारणाच्या लोकचळवळीला बळ द्यावे, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
सातार्याच्या मातीत उमटतोय जलसंधारणाचा नवा इतिहास ! 1,500 हून अधिक वनराई बंधारे पूर्ण
पहिल्या पाच दिवसांतच 1,000 चा टप्पा पार; शाळकरी मुलांपासून ग्रामस्थांपर्यंत हजारो हात श्रमदानात
by Team Satara Today | published on : 07 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा