जिल्ह्यात घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

दोन आरोपींसह दोन सराफ पोलिसांच्या ताब्यात; 23 गंभीर गुन्ह्यांची उकल

by Team Satara Today | published on : 29 July 2025


सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये दरोडा ,चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी असे तब्बल 23 गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन मुख्य आरोपींसह दोन सोनारांना अटक केली आहे. या कारवाईत 52 तोळे सोने 50 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल असा 52 लाख 50 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी दिली. 

सचिन यंत्र्या भोसले वय 30 राहणार फडतरवाडी तालुका सातारा, नदीम धर्मेंद्र काळे वय 22 राहणार तुजारपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली, आशिष चंदुलाल गांधी व 39 राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा (सराफ), संतोष जगन्नाथ घाडगे वय 48 राहणार देगाव तालुका सातारा (सराफ) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या खबर्‍यामार्फत सराईत गुन्हेगार भोसले आणि त्याच्या साथीदारांची माहिती प्राप्त झाली होती. या टोळीने मसूर, उंब्रज, फलटण, मल्हार पेठ, कराड, सातारा, वडूज, पुसेगाव, लोणंद, खंडाळा या पोलीस स्टेशन अंतर्गत तब्बल 23 गुन्हे केले होते. देवकर यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे आणि त्यांच्या तपास पथकाने जिहे, तालुका सातारा येथे सापळा रचून सचिन भोसले व नदीम कोळे याला अटक केली. तसेच या कारवाईत वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली. या दोघांच्या चौकशीमध्ये चोरीचे दागिने विकत घेणारे आशिष गांधी व संतोष घाडगे यांची नावे निष्पन्न झाली. त्यांनाही तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले. सचिन भोसले आणि त्याच्या इतर सात साथीदारांनी सातारा जिल्ह्यामध्ये एक दरोडा, 8 चेन स्नॅचिंग, तीन जबरी चोरी, 8 घरफोडी व तीन इतर चोर्‍या असे 23 प्रकारचे गुन्हे केले असून पोलिसांनी हे उघडकीस आणले आहेत. तसेच त्यांच्याकडून चोरीचे सोने घेणार्‍या सातारा व कोरेगाव तालुक्यातील दोन सोनारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 52 तोळे एक ग्रॅम पाचशे तीस मिली वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या सोन्याच्या दागिन्यांची बाजारभावाप्रमाणे 52 लाख रुपये किंमत आहे

या कारवाईमध्ये परितोष दातीर, पोलीस अंमलदार विश्वनाथ संकपाळ, आतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, मुनीर मुल्ला, हसन तडवी, आबा कदम, अजय जाधव, अमित झेंडे, शिवाजी भिसे, मनोज जाधव, प्रवीण कांबळे, स्वप्नील दौंड, प्रवीण पवार, धीरज महाडिक, वैभव सावंत, अधिक वीर, पंकज बेसके, दलजीत जगदाळे, संभाजी साळुंखे यांनी सहभाग घेतला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माजी आरोग्यनिरीक्षकांची हमरीतुमरी
पुढील बातमी
तलवार बाळगल्याप्रकरणी युवकावर गुन्हा

संबंधित बातम्या