घायवळ टोळीविरोधात कोथरूड पोलिसांनी मोठी कारवाई; अजय सरोदे याला अटक; घरातून तब्बल 400 काडतुसे जप्त

by Team Satara Today | published on : 03 December 2025


पुणे : पुण्यातील कुख्यात निलेश घायवळ टोळीविरोधात कोथरूड पोलिसांनी पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे. घायवळ टोळीचा सक्रिय सदस्य आणि निलेश घायवळचा नंबरकारी असणाऱ्या अजय महादेव सरोदे याला अटक केली असून, त्याच्या घरातून तब्बल 400 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

17 सप्टेंबरच्या रात्री कोथरूड परिसरात सलग दोन हल्ल्यात एका तरुणावर गोळीबार आणि दुसऱ्यावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनांनंतर घायवळ टोळीच्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली. या हल्ल्याच्या तपासादरम्यान अजय सरोदे हा देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे निश्चित होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

सरोदे याच्या अटकेनंतर करण्यात आलेल्या घरझडतीत 200 जिवंत काडतुसे आणि 200 रिकाम्या पुंगळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. दरम्यान सरोदे याच्याकडे परवानाधारक पिस्तुल असल्याचेही समोर आले आहे. सरोदेला हा परवाना २९ जानेवारी २०२४ रोजी पुणे पोलिसांनी दिला आहे, त्यामुळे ज्या सरोदेवर यापूर्वी देखील दोन गुन्हे दाखल असताना त्याला शस्त्र परवाना दिलाच कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यादी देखील पुणे पोलिसांनी देऊ केलेल्या शस्त्र परवडण्यावरून अनेक वाद झालेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शस्त्र परवाना मंजुरी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता अजय सरोदे याच्यावर पूर्वीचे दोन गुन्हे दाखल असून तो घायवळ टोळीचा सक्रिय सदस्य असल्याची माहिती असूनही अशा प्रकारे शस्त्र परवाना कसा मंजूर झाला याची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, सरोदे याने लोणावळ्यातील स्वतःच्या फार्महाऊस जवळ तसेच अहिल्यानगरच्या सोनेगाव परिसरात गोळीबाराचा सराव केल्याची कबुली दिली. या सरावादरम्यान टोळीचा प्रमुख निलेश घायवळ हा देखील सोबत असल्याचे तपासात उघड झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या काडतुसांचा स्रोत, पुरवठ्याचा मार्ग आणि त्यामागील गुन्हेगारी हेतू शोधण्यासाठी अधिक तपास सुरू असून सध्या टोळीचा मुख्य सुत्रधार निलेश घायवळ लंडनमध्ये फरार आहे आणि त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे, त्यामुळे या कारवाईनंतर पोलिसांनी घायवळ टोळीच्या गुन्हेगारी साम्राज्यावर आणखी घाव घातल्याचे मानले जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बा.सी.मर्ढेकरांची कविता विश्वात्मक पसायदान मागणारी होती - निलेश महिगावकर; मर्ढे येथील बा.सींच्या निवासस्थानी जयंती उत्साहात
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात पालिका निवडणुकांसाठी 66.59% मतदान; मेढा नगरपंचायतीत सर्वाधिक 84% मतदान झाल्याने धाकधूक वाढली

संबंधित बातम्या