कॅनबेरा : मोनाश विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पृथ्वीखाली दडलेल्या खजिन्याचा रहस्यभेद केला आहे. त्यांनी क्वार्ट्जमधून सोने तयार होण्याची प्रक्रिया उलगडली असून, यासंदर्भातील संशोधन नेचर जिओसायन्स या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या महत्त्वपूर्ण शोधामुळे सोन्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेबाबतचे अनेक अनुत्तरित प्रश्न स्पष्ट झाले आहेत.
नेचर जिओसायन्समध्ये प्रकाशित ‘गोल्ड नगेट पॅराडॉक्स’ या संशोधनात, भूकंप आणि क्वार्ट्जमधील सोन्याच्या निर्मितीची प्रक्रिया तपशीलवार मांडण्यात आली आहे. भूकंपाच्या ताणामुळे सोन्याचे मोठे तुकडे कसे तयार होतात, याविषयी शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. मोनाश विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी भूकंपाच्या ताणाचे अनुकरण करून प्रयोगादरम्यान क्वार्ट्जमधून सोने काढले.
संशोधकांच्या मते, भूकंपादरम्यान क्वार्ट्जच्या विवरांमध्ये निर्माण होणाऱ्या उच्च दाबामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते. यामुळे पायझोइलेक्ट्रिक व्होल्टेज निर्माण होतो, जो क्वार्ट्जमध्ये तरंगत असलेल्या सोन्याच्या कणांसाठी मुख्य कारण ठरतो. याच प्रक्रियेमुळे क्वार्ट्जमधील सोने वेगळे होते आणि त्याचे मोठे तुकडे तयार होतात. भूकंपाच्या ताणामुळे निर्माण झालेल्या दाबाने क्वार्ट्जमध्ये क्रॅक तयार होतात. या विवरांमध्ये हायड्रोथर्मल द्रवपदार्थ प्रवेश करतात आणि त्याद्वारे सोने तयार होते. ही प्रक्रिया पृथ्वीच्या खाली खोलवर घडते.
या संशोधनामुळे सोन्याचे नवीन साठे शोधण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पायझोइलेक्ट्रिक प्रभावाचा अभ्यास करून शास्त्रज्ञांना सोन्याच्या साठ्यांची संभाव्य ठिकाणे शोधता येऊ शकतात. यामुळे सोन्याच्या शोधासाठी नवी तंत्रे विकसित करण्याची दारे उघडली आहेत.
क्वार्ट्ज हे सिलिकॉन आणि ऑक्सिजनपासून बनलेले स्फटिकासारखे खनिज असून, ते पृथ्वीच्या अंतर्गत थरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. भूकंप आणि हायड्रोथर्मल प्रक्रिया यांच्या साहाय्याने क्वार्ट्ज सोन्यात बदलू शकते, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेकडे आहे. अमेरिकेत 8,133 टन सोने आहे, तर भारत 840 टन सोन्याच्या साठ्यासह नवव्या क्रमांकावर आहे. या संशोधनामुळे भविष्यात भारतासह इतर देशांना सोन्याचे नवे साठे शोधण्यात मदत होऊ शकते.
या महत्त्वपूर्ण शोधामुळे सोन्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेवर सखोल प्रकाश टाकला गेला आहे. शास्त्रज्ञांना भूकंपामुळे जमिनीखाली सोन्याचे साठे कसे तयार होतात, हे समजले आहे. हे संशोधन सोन्याच्या अर्थशास्त्रासाठीही महत्त्वाचे ठरणार असून, यामुळे सोन्याच्या साठ्यांच्या शोधाला नवी दिशा मिळेल. मोनाश विद्यापीठातील या अभ्यासाने भूकंप, खनिज विज्ञान आणि सोन्याच्या रसायनशास्त्रातील नवे दालने उघडली आहेत. या शोधामुळे पृथ्वीखाली दडलेल्या संपत्तीच्या रहस्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.