फलटण : तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही वर्षांत जलस्वराज पाणीपुरवठा योजना, टंचाई निवारण योजना, मागासवर्गीय वस्ती पाणीपुरवठा योजना, सासवड पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशन तसेच धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्यांतर्गत विविध पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला; परंतु यावर्षी पर्जन्यमान कमी राहिल्याने पाणीसाठा खालवला. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली. जुलै संपला तरी पाऊस पडला नसल्याने गावोगावी पाण्याचे टँकर सुरू केले आहेत.
फलटण पश्चिम तालुक्यात विविध पाणीपुरवठा योजनांमधून पाइपलाइन टाकणे, विहिरींची खोदाई, जलस्रोतांची निर्मिती आणि वितरण व्यवस्था उभारण्याची कामे करण्यात आली. मात्र, यंदाच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे या योजनांवर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे संकट ओढवले असून, अनेक गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
यावर्षी मान्सूनने अपेक्षित साथ दिली नसल्याने जुलै महिना संपत आला तरी तालुक्याच्या पश्चिम भागात मोठा पाऊस झालेला नाही. परिणामी विहिरी, बोअरवेल, ओढे आणि अन्य जलस्रोतांची पाणीपातळी खालावली आहे. अनेक गावांतील नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित ग्रामपंचायतींनी सुमारे महिनाभरापूर्वी प्रशासनाकडे पाणीटंचाईचे प्रस्ताव सादर केले होते. प्रस्ताव दाखल झाल्यानंतरही पावसाची प्रतीक्षा कायम राहिली. मात्र पावसाने पुन्हा ओढ दिल्याने टंचाई अधिक तीव्र झाली आणि अखेर प्रशासनाने परिस्थितीची दखल घेत प्रभावित गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
पाणीपुरवठा योजनांवर निधी खर्च होऊनही दुष्काळसदृश परिस्थितीत अनेक योजना अपुऱ्या ठरत आहेत. भविष्यात अशा संकटाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी आणि शाश्वत जलस्रोत निर्माण करणे, उपलब्ध योजनांचे प्रभावी नियोजन करणे, जलसंधारणाची कामे गतीने पूर्ण करणे तसेच धोम-बलकवडी प्रकल्पासह उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी समाधानकारक पाऊस होईपर्यंत पश्चिम भागातील पाणीटंचाईचे संकट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धोम-बलकवडी कालव्याद्वारे पाणी ओढ्याला सोडावे. -संतोष जाधव, सासवड