एअर मार्शल सुनील काशिनाथ विधाते, AVSM, YSM, VM, एअर ऑफिसर-इन-चार्ज पर्सोनेल (AOP), यांची सैनिक स्कूल सातारा येथे भेट

by Team Satara Today | published on : 04 August 2025


सातारा : एअर मार्शल सुनील काशिनाथ विधाते, AVSM, YSM, VM, एअर ऑफिसर-इन-चार्ज पर्सोनेल (AOP) यांनी दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या मातृसंस्थेला म्हणजेच सैनिक स्कूल सातारा येथे भेट दिली. आगमनानंतर त्यांना शाळेच्या वतीने मानाच्या गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. ज्यामुळे शाळेच्या एका नामांकित माजी विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात येत असल्याचा अभिमान व्यक्त झाला.

एअर मार्शल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अजरामर पुतळ्यास पुष्पांजली अर्पण केली आणि शाळेच्या शहीद स्तंभाजवळ पुष्पचक्र अर्पण करून शाळेच्या शूर माजी विद्यार्थ्यांच्या सर्वोच्च बलिदानाला आदरांजली वाहिली.

दहानूकर सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये एअर मार्शल यांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना संबोधित केले. भारतीय वायुसेनेतील आपल्या गौरवशाली सेवाजीवनाचा अनुभव सांगताना, त्यांनी विद्यार्थ्यांना सशस्त्र दलात सेवा करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांनी उद्दिष्टांप्रती समर्पण, चिकाटी आणि सेवाभावी जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी भारतीय वायुसेनेतील भरती संदर्भातील प्रचार साहित्य शाळा कप्तानला भेट दिले.

एअर मार्शल यांनी शाळेतील विविध शैक्षणिक व प्रशिक्षण सुविधा पाहिल्या आणि भविष्याचे नेते घडविण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच शाळेमध्ये सुरु असलेल्या पायाभूत सुविधा, विकास- प्रकल्पांचेही त्यांनी निरीक्षण केले व विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधा देण्याच्या दृष्टीकोनाबद्दल शाळेचे कौतुक केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'प्रतापगड'चा आगामी हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा
पुढील बातमी
भिलार-पाचगणी परिसर पावसाळी पर्यटनाने बहरला

संबंधित बातम्या