अमर रहे, अमर रहे.. जवान सोमनाथ सुर्वे अमर रहे!

कराड तालुक्यात अंत्यदर्शनासाठी लोटला जनसमूदाय

by Team Satara Today | published on : 10 October 2025


कराड : अमर रहे, अमर रहे... सोमनाथ सुर्वे अमर रहे... जय हिंद, भारत माता की जय... या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. आज शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास भारतीय सैन्य दलातील  मराठा लाईट इंफन्ट्रीमध्ये कार्यरत असलेले कऱ्हाड तालुक्यातील आबईचीवाडी (जि. सातारा) येथील जवान सोमनाथ शामराव सुर्वे (वय ४७) यांचे पंजाबमधील चंदीगड येथून पार्थिव त्यांच्या गावी आणण्यात आले. तत्पूर्वी त्यांची पाटण तिकाटणे येथून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यासाठी कऱ्हाड तालुक्यातील अबालवृध्दांचा जनसमुदाय लोटला होता. 

आबईचीवाडी येथील सोमनाथ सुर्वे हे गेली १८ वर्षे भारतीय सैन्यदलातील मराठा लाईट इंफन्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. त्यांना मध्यंतरी हवालदार पदावर बढती मिळाली होती. सहा महिन्यांनी ते निवृत्त होणार होते. सध्या चंदीगढमध्ये ते सैन्यदलात कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांना काल अचानक हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते.

गावातील तरुण सैन्यदलात भरती व्हावे, यासाठी ते सुट्टीवर आल्यावर नेहमी युवकांना मार्गदर्शन करत असत. त्यांचे पार्थिव चंदीगडवरुन आज पुणे विमानतळावर आणण्यात आले. तेथे भारतीय सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या आबईचीवाडी या मूळगावी आणण्यात आले.

तत्पूर्वी कराडच्या पाटण तिकाटणे येथून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यासाठी कऱ्हाड तालुक्यातील आबालवृध्दांचा जनसमुदाय लोटला होता. यावेळी अमर रहे, अमर रहे... सोमनाथ सुर्वे अमर रहे... जय हिंद, भारत माता की जय... या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुनावळे जागतिक दर्जाचे जलपर्यटन पर्यटकांसाठी खुले; पर्यटकांना आता साहसी खेळांचा आनंद लुटता येणार
पुढील बातमी
कराड बसस्थानकातील तरुणाने काढली तरुणीची छेड

संबंधित बातम्या