दिलली : नीट पेपर फुटी प्रकरणावरून जंतरमंतरवर सलग ३६ दिवस सुरू असलेले आंदोलन अखेर संपले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि सरकारने सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने हे आंदोलन मागे घेतले. या पार्श्वभूमीवर शनिवारी सीजेपीच्या नेत्यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांची सदिच्छा भेट घेतली. आंदोलन संपले असले तरी, २० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर करणाऱ्या पोलिसांविरोधात कायदेशीर लढाई सुरूच राहील, अशी भूमिका पक्षाने स्पष्ट केली आहे.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास म्हणाले की, या भेटीचा कोणताही निश्चित अजेंडा नव्हता. मात्र, चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात पार पडली. यावेळी विशेष पोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पक्षाने दिल्ली पोलिसांना स्पष्ट केले आहे की, २० जुलैच्या मोर्चादरम्यान ज्या पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
पुराव्यांच्या आधारे कारवाई
व्हिडिओ आणि फोटोंमध्ये जे जवान विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आणि हातावर लाठ्या मारताना दिसत आहेत, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाईल. या प्रक्रियेसाठी पक्षाने एक स्वतंत्र वेबसाईट सुरू केली असून, गरज पडल्यास पक्ष न्यायालयाचेही दरवाजे ठोठावणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या सहकार्याचे कौतुक
सीजेपीचे नेते आशुतोष रांका यांनी या बैठकीला सकारात्मक म्हटले आहे. ते म्हणाले की, "२० जुलैला जे घडले ते अत्यंत दुर्दैवी होते. परंतु, आम्ही हेही मान्य करतो की, दिल्ली पोलिसांकडून आम्हाला इतर वेळी सातत्याने सहकार्य मिळाले." "अंत भला तो सब भला," असे म्हणत रांका यांनी देशभरातील तरुणांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.
सरकारने सीजेपीच्या कुठल्या मागण्या मान्य केल्या?
- वाढत्या दबावामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
- नीट पेपर फुटीच्या नैराश्यातून ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक भरपाई दिली जाणार आहे.
- आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर आणि आंदोलकांवर दाखल झालेले सर्व एफआयआर मागे घेण्याचे आणि यापुढे नवीन गुन्हे दाखल न करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.